मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारतीय क्रिकेट संघाने सूर्यकुमार यादव याच्या वेगवान अर्धशतकीय खेळी आणि गोलंदाजांच्या जबरदस्त कामगिरीमुळे तिसऱ्या आणि अंतिम टी-२० सामन्यात वेस्टइंडिजला १७ धावांनी पराभूत करून मालिका ३-० अशी खिशात घातली आहे. याच कामगिरीमुळे भारतीय संघाने आयसीसीच्या टी-२० क्रमवारीत पहिल्या स्थानी झेप घेतली आहे. कोलकाता येथील ईडन गार्डन्स मैदानात झालेला तिसरा टी-२० सामना जिंकून भारताने मालिकेत निर्भेळ यश संपादन केले. शिवाय इंग्लंडच्या संघाला मागे टाकून आयसीसीच्या क्रमावारीत पहिले स्थान पटकावले आहे. टी-२० प्रकारात भारताचा हा सलग ९ वा विजय आहे. तसेच पूर्णवेळ कर्णधार म्हणून रोहित शर्मा याच्या नेतृत्वाखालील हा सलग सहावा विजय आहे. घरच्या मैदानांवरील हा भारताची सलग सहावा मालिका विजय होता. भारत २०१९ मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध टी-२० मालिकेत घरच्या मैदानावर पराभूत झाला होता.
तिसऱ्या सामन्यात भारताला फलंदाजीचे आमंत्रण मिळाल्यानंतर सूर्यकुमार यादव याच्या ६५ धावा आणि व्यंकटेश अय्यर याच्या नाबाद ३५ धावांसह चौथ्या गड्यासाठी ३७ चेंडूत ९१ धावांच्या दमदार भागिदारीच्या जोरावर भारताने ५ बाद १८४ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना निकोलस पूरन याने ६१ धावांची तडफदार अर्धशतकीय खेळी केलेली असतानाही वेस्टइंडिजचा संघ २० षटकांत ९ गडी गमावून १६७ धावा करू शकला. भारतीय गोलंदाजांमध्ये दीपक चाहर याने फक्त ११ चेंडू फेकले. त्यामध्ये त्याने विरोधी संघाचे दोन गडी टिपले. त्यानंतर त्याच्या पायाला दुखापत झाल्याने तो खेळू शकला नाही. हर्षल पटेल याने नंतर २२ धावा देत तीन गडी, तर शार्दुल ठाकूर याने ३३ धावा देऊन दोन गडी बाद केले. व्यंकटेश अय्यर याने खऱ्या अर्थाने अष्टपैलू कामगिरी केली. आधी फलंदाजीत सूर्यकुमार यादव याला चांगली साथ दिली. नंतर गोलंदाजी करताना २.१ षटकात २३ धावा देऊन दोन गडी बाद केले.