मुंबई – युरोपसह अमेरिका आणि अन्य काही देशांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढत असताना आता दक्षिण आफ्रिकेत कोरोना विषाणूचे नवीन प्रकार आल्यापासून जगभरात खळबळ उडाली असून खळबळ उडाली असून अनेक देशांनी विमान उड्डाणे रद्द केली आहेत. तसेच महत्त्वाचे दौरेही राजनैतिक दौरे स्थगित करण्यात आले आहेत.
भारतीय क्रिकेट संघ पुढील महिन्यात दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात संघाला तीन सामन्यांची कसोटी, एकदिवसीय आंतरराष्ट्रीय आणि टी-20 आंतरराष्ट्रीय मालिका खेळायची आहे. तथापि, कोरोनाच्या नव्या प्रकारामुळे जगभरातील सर्व देश दक्षिण आफ्रिकेच्या प्रवासावर बंदी घालण्याचा विचार करत आहेत. भारत अ संघ सध्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर आहे. तसेच टीम इंडियाला डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात दक्षिण आफ्रिकेला रवाना होणार आहे. मात्र, या दौऱ्याबाबत बीसीसीआयने अपडेट दिले आहे.
एका अहवालानुसार, देशात कोरोनाचे नवीन प्रकार आल्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या सरकारने हाय अलर्ट लागू केला आहे. अशा परिस्थितीत बाहेरून येणाऱ्या प्रवाशांची कोरोना तपासणी केली जात आहे. बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, आताच्या वेळापत्रकात कोणताही बदल होणार नाही. हा दौरा नियोजित वेळापत्रकानुसार होणार आहे. तसेच आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत आणि CSA च्या संपर्कात आहोत, असेही ते म्हणाले.
कोरोना विषाणूच्या नवीन प्रकारामुळे टीम इंडियाचा दक्षिण आफ्रिका दौरा धोक्यात आला होता. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला कसोटी सामना दि. 17 डिसेंबरपासून जोहान्सबर्ग येथे खेळवला जाणार आहे. सध्या नेदरलँडचा संघही दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर आहे. मालिकेतील दुसरा आणि तिसरा एकदिवसीय सामना नियोजित वेळेनुसार होईल की नाही हे ठरवण्यासाठी नेदरलँड क्रिकेट संघ व्यवस्थापन क्रिकेट दक्षिण आफ्रिकेच्या अधिकाऱ्यांची भेट घेणार आहे.