मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारतीय क्रिकेट संघ आगामी आशिया चषक स्पर्धेसाठी पाकिस्तानात खेळायला जाणार का या प्रश्नाचे उत्तर अखेर आज मिळाले आहे. यासंदर्भात भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI)चे सचिव जय शाह यांनी घोषणा केली आहे. आगामी आशिया चशक पाकिस्तानात खेळला जाणार असून भारतीय संघ पाकिस्तानला जाणार नाही, असे शहा यांनी स्पष्ट केले आहे.
आशियाई क्रिकेट परिषदेचे (ACC) अध्यक्ष आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) सचिव जय शाह यांनी म्हटले आहे की, आशिया चषक २०२३ पाकिस्तानात होणार की नाही याबाबतचा निर्णय आगामी काळात घेतला जाऊ शकतो. महत्त्वाचे म्हणजे आशिया चषक २०२३चे आयोजन पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) करणार आहे आणि फ्युचर टूर प्रोग्रामनुसार तो पाकिस्तानमध्ये खेळवला जाणार आहे. बीसीसीआयच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत (एजीएम) आज यावर चर्चा झाली.
बीसीसीआयच्या एजीएममध्ये सौरव गांगुलीच्या जागी रॉजर बिन्नी बीसीसीआयच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेत असल्याची घोषणा करण्यात आली. BCCI ने निर्णय घेतला आहे की टीम इंडिया २०२३ च्या आशिया कपसाठी पाकिस्तानला जाणार नाही आणि अशा परिस्थितीत ही स्पर्धा तटस्थ ठिकाणी हलवली जावी. क्रिकबझच्या बातमीनुसार, जय शाह म्हणाले की, “आशिया कप स्पर्धेच्या ठिकाणासंदर्भात आम्ही निर्णय घेतला आहे की टीम इंडिया पाकिस्तानला जाणार नाही.”
२००८ पासून भारतीय क्रिकेट संघाने पाकिस्तानचा दौरा केलेला नाही. २००८च्या आशिया चषकासाठी भारतीय संघ शेवटचा पाकिस्तानला गेला होता. दोन्ही देशांमधील खराब राजकीय संबंधांमुळे द्विपक्षीय मालिका दीर्घकाळ खेळली गेली नाही. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामने फक्त आयसीसी स्पर्धा आणि आशिया चषक दरम्यान खेळवले जातात.
Indian Cricket Team Pakistan Asia Cup BCCI