इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – १९४७ मध्ये फाळणीनंतर भारत-पाकिस्तान हे दोन्ही देश तयार झाले. गेल्या ७५ वर्षात या दोन्ही देशांमधील विस्तव काही जात नाही. सर्वच पातळ्यांवर पाकिस्तान हा भारताचा पारंपरिक प्रतिस्पर्धी पाहिला आहे. साहजिकच क्रिकेटमध्ये दोन्ही संघांमधील लढती या नेहमीच रंगतदार ठरतात. असा आतापर्यंतचा इतिहास आहे. भारत आणि पाकिस्तान या परंपरागत प्रतिस्पर्ध्यांमध्ये पुढील पाच वर्षांत तरी मालिका होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) २०२३ ते २०२७ पर्यंतच्या दौरे आणि स्पर्धांचा कार्यक्रम घोषित केला आहे. त्यानुसार, भारत पुढील पाच वर्षात एकूण १४१ सामने खेळणार असला तरी भारत-पाकिस्तान मालिकेचा यात समावेश नाही.
‘आयसीसी’ने मे २०२३ ते एप्रिल २०२७ या पाच वर्षे कालावधीचा कार्यक्रम जाहीर केला. यात भारतीय संघ ३८ कसोटी, ४२ एकदिवसीय आणि ६१ ट्वेन्टी-२० सामने खेळणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील बिघडलेल्या राजनैतिक संबंधांमुळे ‘आयसीसी’ने या दोन देशांमध्ये मालिकेला स्थान दिलेले नाही. या कार्यक्रमात होणाऱ्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिका तीन सामन्यांच्याच राहणार आहेत.
भारतासाठी विशेष म्हणजे आतापर्यंत चार कसोटी सामन्यांची होणारी ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका आता पाच सामन्यांची होईल.
भारत १९९१नंतर प्रथमच सन २०२४-२५ मध्ये ऑस्ट्रेलियात पाच सामन्यांची मालिका खेळेल. त्यापूर्वी भारत वेस्ट इंडिजचा दौरा करणार आहे. या दौऱ्यात दोन कसोटी तसेच प्रत्येकी तीन एकदिवसीय आणि टी २० सामने होतील. भारत २०२४मध्ये बांगलादेशशी मायदेशात दोन सामन्यांची मालिका खेळणार आहे. इंग्लंडविरुद्धची मालिकादेखील पाच सामन्यांची असेल. सदर कार्यक्रमात १२ सदस्यीय राष्ट्रांमध्ये एकूण ६९४ सामने खेळले गेले. या वेळी मात्र ही संख्या वाढली असून, नव्या कार्यक्रमपत्रिकेनुसार एकूण ७७७ आंतरराष्ट्रीय सामने होतील. यात १७३ कसोटी, २८१ एकदिवसीय आणि ३२३ ट्वेन्टी-२० सामन्यांचा समावेश आहे.
या कार्यक्रमपत्रिकेनुसार इंग्लंड सर्वाधिक ४३ कसोटी सामने खेळणार आहे. त्यानंतर ऑस्ट्रेलिया (४०) आणि भारत (३८) यांचा क्रमांक लागतो. अन्य देशांमध्ये न्यूझीलंड ३२, दक्षिण आफ्रिका २९, पाकिस्तान २९, तर श्रीलंका, वेस्ट इंडिज प्रत्येकी २५ कसोटी सामने खेळणार आहे. पुढील वर्षी होणाऱ्या एकदिवसीय प्रकाराच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेपूर्वी भारत २७ एकदिवसीय सामने खेळणार आहे. याला झिम्बाब्वे दौऱ्याने सुरुवात होईल. त्यानंतर दक्षिण आफ्रिका भारतात तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. त्यानंतर ट्वेन्टी-२० विश्वचषकापूर्वी भारत न्यूझीलंड दौऱ्यात तीन एकदिवसीय सामने खेळेल, जाणार आहेत.
Indian Cricket Team Next 5 Year Matches Schedule
ICC BCCI Pakistan Series