मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – न्यूझीलंडविरुद्धच्या तीन एकदिवसीय आणि तीन टी-20 सामन्यांसाठी तसेच ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. अनुभवी फलंदाज केएल राहुल आणि अक्षर पटेल वैयक्तिक कारणांमुळे न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे आणि टी-20 मालिकेत खेळणार नाहीत. त्याचवेळी रवींद्र जडेजाचे कसोटी संघात पुनरागमन झाले आहे. मात्र, जडेजाचा फिटनेस पाहणे बाकी आहे. त्यानंतरच त्याच्या खेळावर शिक्कामोर्तब होईल.
भारतीय संघ 18, 21 आणि 24 जानेवारीला न्यूझीलंडविरुद्ध तीन एकदिवसीय सामने खेळणार आहे. त्यानंतर 27, 29 जानेवारी आणि 1 फेब्रुवारीला तीन टी-20 सामने होतील. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेला ९ फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. पहिली कसोटी 9 ते 13 फेब्रुवारी दरम्यान नागपुरात आणि दुसरी कसोटी 17 ते 21 फेब्रुवारी दरम्यान दिल्लीत खेळवली जाईल. या मालिकेतील उर्वरित दोन कसोटी सामने अनुक्रमे १ मार्च आणि ९ मार्च रोजी धर्मशाला आणि अहमदाबाद येथे खेळवले जातील.
न्यूझीलंडविरुद्धच्या T20 साठी पृथ्वी शॉची निवड
रणजी ट्रॉफीमध्ये मुंबईसाठी आसामविरुद्ध ३७९ धावांची खेळी करणारा पृथ्वी शॉ जुलै २०२१ नंतर टीम इंडियात परतला आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी त्याची निवड झाली आहे. शॉने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्येही दणका दिला होता. रणजी ट्रॉफीमध्ये त्रिशतक झळकावल्यानंतर बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी त्याचे कौतुक केले होते.
रोहित आणि विराट
रोहित शर्मा आणि विराट कोहली या वरिष्ठ खेळाडूंची टी-२० संघात पुनर्निवड करण्यात आलेली नाही. न्यूझीलंडविरुद्ध फक्त हार्दिक पांड्या कर्णधार असेल. श्रीलंकेविरुद्ध दुखापतग्रस्त झालेल्या संजू सॅमसनलाही संघात ठेवण्यात आलेले नाही. त्यांच्या जागी जितेश शर्मा यांची निवड करण्यात आली. श्रीलंकेविरुद्ध खराब कामगिरी करणाऱ्या हर्षल पटेलला संघातून वगळण्यात आले आहे.
न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी संघ:
हार्दिक पंड्या (कर्णधार), सूर्यकुमार यादव (उपकर्णधार), इशान किशन (यष्टीरक्षक), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, युझवेंद्र सिंग चहल, अर्शदीप सिंग उमरान मलिक, शिवम मावी, पृथ्वी शॉ, मुकेश कुमार.
भरत आणि शाहबाज अहमद यांची निवड
केएल राहुल आणि अक्षर पटेल यांच्या अनुपस्थितीत यष्टीरक्षक केएस भरत आणि अष्टपैलू शाहबाज अहमद यांची न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी निवड करण्यात आली आहे. श्रीलंकेविरुद्धच्या वनडेमध्ये न खेळलेल्या शार्दुल ठाकूरची अर्शदीप सिंगच्या जागी निवड करण्यात आली आहे.
न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी संघ:
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, ईशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, केएस भरत (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, शार्दुल ठाकूर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमरान मलिक.
https://twitter.com/BCCI/status/1613939411573706760?s=20&t=auoW22_2RUPslzCFUa6IQg
ईशान आणि सूर्यकुमार
दुखापतीमुळे बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेत न खेळलेला कर्णधार रोहित शर्माचे पुनरागमन झाले आहे. कार अपघातात जखमी झालेल्या ऋषभ पंतची ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी निवड झालेली नाही. त्याच्या जागी इशान किशनचा कसोटी संघात समावेश करण्यात आला आहे. केएस भरत त्याच्यासोबत दुसरा यष्टिरक्षक असेल. झारखंडकडून देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या किशनने 2014 मध्ये आसामविरुद्ध प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने 48 सामन्यात 38.76 च्या सरासरीने 2985 धावा केल्या आहेत. नोव्हेंबर 2016 मध्ये त्याने दिल्लीविरुद्ध 273 धावांची खेळी केली होती. ही त्याची प्रथम श्रेणीतील सर्वोच्च खेळी आहे.
टी-20 क्रिकेटमध्ये धमाका करणाऱ्या सूर्यकुमार यादवलाही कसोटी संघात ठेवण्यात आले आहे. त्याने 2010 मध्ये मुंबईकडून दिल्लीविरुद्ध प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. सूर्याने 44.79 च्या सरासरीने 5549 धावा केल्या आहेत. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह पूर्णपणे तंदुरुस्त नसल्याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी त्याची निवड झाली नाही. त्याच्या अनुपस्थितीत मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव आणि जयदेव उनाडकट यांच्याकडे वेगवान गोलंदाजीची जबाबदारी असेल.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी भारताचा संघ:
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, मो. सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट, सूर्यकुमार यादव.
Indian Cricket Team Declare for New Zealand and Australia