मुंबई – भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय)ने भारतीय संघाच्या क्रणधारपदी अष्टपैलू रोहित शर्माची निवड केली आहे. शर्माला टी-ट्वेंटीनंतर एकदिवसीय संघाचेही नेतृत्व सोपविले आहे. प्रथमच भारतीय संघात वेगवेगळ्या फॉरमॅटमध्ये वेगळे कर्णधार पहायला मिळणार आहेत. परंतु रोहितला कर्णधारपद मिळाल्यानंतर त्याच्या वेतनात वाढ होणार का हा प्रश्न उपस्थित होत आहे.
भारतीय क्रिकेटमध्ये दीर्घकाळानंतर अनेक प्रकारचे बदल अचानक पहायला मिळत आहेत. टी-ट्वेंटी विश्वचषकाच्या पूर्वी विराट कोहली याने कामाचा बोजा कमी करण्याच्या दृष्टीने टी-ट्वेंटी संघाचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय जाहीर केला होता. विराटने कर्णधार म्हणून गौरवास्पद काम केले आहे. परंतु कर्णधार असताना तो एकही आयसीसी चषक जिंकून देऊ शकला नाही. ही उणीव कायमच राहिली.
दक्षिण अफ्रिकेच्या दौर्यावर भारतीय संघ विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली कसोटी क्रिकेट खेळणार आहे. तर एकदिवसीय संघाचे नेतृत्व रोहित शर्माकडे आहे. रोहितकडे आताच एकदिवसीय संघाचे कर्णधारपद सोपवले आहे. त्यामुळे दोन्ही फॉरमॅटचे कर्णधारपद भूषवल्याने रोहितच्या पगारावर काही परिणाम होणार आहे का, याबद्दल चर्चा सुरू झाली आहे.
बीसीसीआयच्या A+ कराराच्या यादीत रोहित शर्माचा समावेश आहे. त्याच्यासोबत विराट कोहली आणि जसप्रीत बुमराहचाही समावेश आहे. या खेळाडूंना बीसीसीआयकडून वार्षिक वेतन म्हणून तब्बल सात कोटी रुपये मिळतात. रोहित शर्मा आता कर्णधार होत असल्याने त्याला किती वेतन मिळेल याची अनेकांना उत्सुकता आहे. सध्याच्या वेतनात वाढ होणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. मात्र, त्याच्या वेतनात कोणताच बदल होणार नाही, असे सूत्रांचे म्हणणे आहे.
रोहित शर्माला ही जबाबदारी प्रथम मिळालेली नाही. यापूर्वी काही वेळा रोहितने भारतीय संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळली आहे. २०१८ मध्ये रोहितला आशिया चषकात कोहलीच्या जागेवर कर्णधार म्हणून पाठविण्यात आले होते. रोहितच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने आतापर्यंत २२ सामने खेळले आहेत. त्यापैकी १८ सामन्यात विजय मिळाला आहे.
विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ २०१७ मधील चॅम्पियन्स ट्रॅफी, २०१९ मधील विश्वचषक आणि २०२१ टी-ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पोहोचला. परंतु तिथे भारतीय संघाला विजय मिळू शकला नाही. तर मुंबई इंडियन्ससाठी सर्वाधिक वेळा आयपीएलचे विजेतेपद जिंकून देणार्या रोहित शर्माकडून आता भारतीय संघाला आयसीसी चषक जिंकण्याची आशा असेल.