मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारतीय क्रिकेट संघाचा भावी कर्णधार हा मुद्दा अगदी सुरुवातीपासून चर्चेत राहिला आहे. कपिल देव, सौरव गांगुली, महेंद्रसिंग धोनी या साऱ्यांच्या नेतृत्वाच्या काळातही त्यांच्या उत्ताराधिकाऱ्याची चर्चा व्हायची. आणि आता रोहित शर्मानंतर टीम इंडियाचे नेतृत्व कुणाकडे जाणार याची चर्चा सुरू झाली आहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (बीसीसीआय) माजी अध्यक्ष सौरव गांगुली याने यासंदर्भात संकेत दिले आहेत. ऋषभ पंत, हार्दिक पांड्या आणि के.एल. राहुल यांच्या नावांची हिटमॅन रोहित शर्माचे उत्तराधिकारी म्हणून चर्चा आहे. विराट कोहलीने टी-२० चे कर्णधारपद सोडल्यानंतर रोहितकडे धुरा सोपविण्यात आली. त्यानंतर विराटला एकदिवसीय संघाचं नेतृत्व काढून घेतल्यामुळे रोहितला ती जबाबदारी सोपविण्यात आली. पुढे विराटने स्वतःच कसोटी संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला, त्यामुळे रोहितकडे तिन्ही फॉरमॅटचे कर्णधारपद आले. सौरव गांगुलीने भावी कर्णधाराबद्दल बोलताना काही संकेत दिले. तो म्हणाला, ‘आयपीएलमध्ये आम्ही हार्दिक पांड्याचं नेतृत्व बघितलं आहे. गेल्यावर्षी त्याच्या नेतृत्वात गुजरातने टायटन्स चॅम्पिअनशीप पटकावली. त्याची कामगिरी बघून टी-२०मध्ये त्याच्याकडे भारतीय संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले.’
पांड्याची कसोटी
हार्दिक पांड्या कसोटी क्रिकेटमध्ये कधी परतणार हा एक मोठा प्रश्न आहे. तो एकदिवसीय आणि टी-२० मध्ये दमदार कामगिरी करीत आहे. पण कसोटीमध्ये परतण्याची त्याला मुळीच घाई नाही. पूर्णपणे तंदुरुस्त झाल्यावरच कसोटीमध्ये परतेन, मला मुळीच घाई करायची नाही, असे हार्दिक पांड्या म्हणाला होता.
म्हणून हाच खेळाडू दावेदार
भारतीय क्रिकेट संघाचे नेतृत्व करण्यासाठी ऋषभ पंत सध्या फीट नाही. त्याला दुखापतीतून सावरायला वेळ आहे. के.एल. राहुलकडून परफॉर्मन्स खराब असल्याने कसोटी संघाचे उपकर्णधारपद काढून घेतले. शिवाय जसप्रित बुमराहला संधी दिली होती, पण तो अपयशी ठरला. अश्यात हार्दिक पांड्याच खरा दावेदार असल्याचे गांगुलीच्या विधानातून स्पष्ट होते.
असा झाला बदल
सौरव गांगुलीचा बीसीसीआय अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपल्यानंतर रॉजर बिनी अध्यक्ष झाले. रवी शास्त्री यांचा प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपल्यावर राहुल द्रवीड मुख्य प्रशिक्षक झाला. तसेच विराटकडून कर्णधारपद काढून घेतल्यानंतर रोहित शर्माकडे जबाबदारी आली. आता रोहितच्या उत्तराधिकाऱ्याची चर्चा सुरू झाली आहे.
Indian Cricket Team Captain Bcci Sourav Ganguly