मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारतीय संघ सध्या न्यूझीलंडच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्यातील टी – २० मालिकेत भारतीय संघाने १-० असा विजय मिळवला आहे. तर, एकदिवसीय मालिकेत भारतीय संघ ० – १ ने पिछाडीवर आहे. या दौऱ्यानंतर भारतीय संघात मोठे बदल होणार आहेत.
न्यूझीलंडच्या दौऱ्यानंतर भारतीय संघ बांगलादेशच्या दौऱ्यावर जाणार आहे. न्यूझीलंडनंतर बांगलादेश दौऱ्यावर टीम इंडिया जाणार असून, त्यामध्ये बदल झालेली दिसतील. न्यूझीलंड दौऱ्यावर गेलेले आठ खेळाडू बांगलादेशमध्ये वनडे मालिकेत खेळताना दिसणार नाहीत. तर कर्णधार रोहित शर्मासह अनेक सिनियर खेळाडू बांगलादेश दौऱ्यातून संघामध्ये पुनरागमन करतील.
न्यूझीलंडमध्ये काल झालेला दुसरा एकदिवसीय सामना पावसामुळे रद्द झाला होता. आता ३० नोव्हेंबर रोजी मालिकेतील निर्णायक सामना होणार आहे. तिथेही भारतीय संघ ३ एकदिवसीय सामने खेळणार आहे.
टी – २० वर्ल्डकपमध्ये भारताचं आव्हान उपांत्य फेरीत संपल्यानंतर कर्णधार रोहित शर्मासह काही सिनियर खेळाडूंना विश्रांती देण्यात आली होती. दरम्यान, बांगलादेशविरुद्धच्या वनडे मालिकेतून कर्णधार रोहित शर्मासह विराट कोहली, केएल राहुल हे खेळताना दिसणार आहेत. तर न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेत खेळलेले शुभमन गिल, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन, कुलदीप यादव, अर्शदीप सिंह आणि उमरान मलिक हे बांगलादेश दौऱ्यात खेळताना दिसणार नाहीत.
बांगलादेश दौऱ्यासाठी रजत पाटीदार आणि राहुल त्रिपाठी या दोन युवा चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. या दोघांनीही देशांतर्गत स्पर्धांमध्ये जबरदस्त कामगिरी केली आहे. तर रिषभ पंतसोबत इशान किशन खेळताना दिसणार आहे. तर वेगवान गोलंदाज कुलदीप सेन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करताना दिसू शकतो. तर फिरकीची मदार अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर आणि शाहबाज अहमदवर असेल. भारत आणि बांगलादेश यांच्यात ४, ७ आणि १० डिसेंबर रोजी खेळवले जातील. त्यानंतर दोन्ही संघांमध्ये दोन कसोटी सामनेही खेळवले जातील.
या खेळाडूंचा असणार समावेश
बांगलादेशविरुद्धच्या मालिकेसाठी भारताचा एकदिवसीय संघ पुढीलप्रमाणे असणार आहे. रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), श्रेयस अय्यर, राहुल त्रिपाठी, शिखर धवन, विराट कोहली. रजत पाटिदार, रिषभ पंत (यष्टीरक्षक), ईशान किशन (यष्टिरक्षक), शाहबाज अहमद, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, कुलदीप सेन, दीपक चाहर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज.
Indian Cricket Team Big Changes after New Zealand Tour