नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – एक कंपनी लहान मुलांसाठी कफ सिरप तयार करते आणि ते सिरप घेतल्याने चक्क १९ मुलांचा मृत्यू होतो. ही घटना उझबेकिस्तानमध्ये गेल्यावर्षी घडली. या घटनेची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली आणि आता रॉयटर्सच्या सूत्रांनी एक मोठा खुलासा केला आहे. या घटनेत भारतीय कंपनीचा हात असल्याचे पुढे आले आहे.
मॅरियन बायोटेकने माया केमटेक इंडियाकडून प्रोपलीन ग्लायकोल हे घटक खरेदी केले. मायाकडे फार्मास्युटिकल-ग्रेड घटकांची विक्री करण्याचा परवाना नसतानाही त्यांनी हा व्यवहार केला. फक्त औद्योगिक कारणांसाठी वापरण्यात येणाऱ्या घटकांमध्ये ते व्यापार करतात. या घटकाचा वापर कफ सिरप बनवण्यासाठी होणार आहे, हे आम्हाला माहिती नव्हते, असे माया केमटेकमधील सूत्रांनी म्हटले आहे. मॅरियनने उझबेकिस्तानमध्ये विक्री करण्यात येणाऱ्या सिरपचा वापर करण्यापूर्वी त्याची चाचणी केली नव्हती.
खरे तर औषधे किंवा सौंदर्यप्रसाधनांचे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांकडून योग्य ती काळजी घेण्यात यावी आणि वापरण्यापूर्वी चाचणी करण्यात यावी, अन्यथा त्यासाठी कंपन्या स्वत: जबाबदार असतील, असा भारतीय नियम आहे. पण हा नियम पाळण्यात आला नाही. दरम्यानच्या काळात उत्तर प्रदेश सरकारने नोएडा येथील मॅरियन बायोटेक कंपनीचा परवाना निलंबित केला होता. जागतिक आरोग्य संघटनेने सुद्धा मॅरियन बायोटेकने तयार केलेल्या एम्ब्रोल आणि डॉक-1 मॅक्स सिरपबाबत इशारा जारी केला होता. पण तरीही हा प्रकार घडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
नोएडातील कंपनी
हे विषारी सिरप तयार करणारी मॅरियन बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नोएडामध्ये आहे. कफ सिरप तयार करण्यासाठी औषधी घटकांचा वापर करण्याऐवजी, विषारी इंडस्ट्रीयल-ग्रेड घटकांचा वापर करण्यात आला, असा गौप्यस्फोट यामध्ये झाला आहे. इंडस्ट्रीयल प्रोपलीन ग्लायकोल हा एक विषारी पदार्थ असून त्याचा वापर लिक्विड डिटर्जंट्स, अँटीफ्रीझ, पेंट्स, कोटिंग्जमध्ये तसेच कीटकनाशकांची परिणामकता वाढवण्यासाठी केला जातो.