नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारतीय तटरक्षक दलाने धाडसी बचाव कार्यात असाधारण कार्यक्षमता आणि जलद प्रतिसाद दाखवला, ज्यामुळे ३६ जणांचे प्राण वाचले आणि संभाव्य पर्यावरणीय आपत्ती टाळली. सीएसआयआर-राष्ट्रीय समुद्रविज्ञान संस्था (सीएसआयआर-एनआयओ) ‘सिंधु साधना’ हे संशोधन जहाज कारवारच्या दिशेने जात असताना संकटात सापडले होते. जहाजाचे इंजिन पूर्णपणे निकामी झाले होते, त्यामुळे ते गतिहीन होते आणि समुद्राच्या प्रवाहावर ते चालत होते. २६ जुलै रोजी दुपारी एक वाजता गोव्यातील तटरक्षक दलाच्या जिल्हा मुख्यालयात यासंबंधीचा संदेश प्राप्त झाला.
‘सिंधु साधना’ बहुमोल वैज्ञानिक उपकरणांनी सुसज्ज आणि महत्त्वपूर्ण संशोधन माहिती घेऊन जात असल्याने परिस्थिती गंभीर होती. शिवाय, पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील कारवार किनाऱ्यापासून हे जहाज जवळ असल्याने तेलगळतीचा धोका होण्याची शक्यता होती, ज्यामुळे सागरी पर्यावरणाचीही हानी झाली असती.
संकटाच्या आवाहनाला त्वरित प्रतिसाद देत भारतीय तटरक्षक दलाने आयसीजीएस सुजित आणि आयसीजीएस वराह या दोन अत्याधुनिक जहाजांवर कुशल पथकांसह सर्वोच्च प्राधान्याने बचाव मोहीम सुरू केली. आपत्तीची संभाव्य तीव्रता ओळखून भारतीय तटरक्षक दलाने जहाजाचे रक्षण, सागरी परिसंस्थेचे रक्षण आणि जहाज मध्येच थांबून राहू नये यासाठी तातडीने उपाययोजना सुरू केल्या.
अतिशय प्रतिकूल हवामानात, समुद्रातील लाटा आणि ४५ नॉटीकल मैलापर्यंत वारे वाहत असतानाही भारतीय तटरक्षक दलाने संकटात सापडलेल्या सीएसआयआर-एनआयओ जहाजाची बचाव मोहीम हाती घेतली. अशा आव्हानात्मक परिस्थितीत जहाज टोईंग करण्यासाठी प्रचंड कौशल्य आणि दृढ निश्चयाने आयसीजीएस सुजीतने ‘सिंधू साधना’ जहाजाला यशस्वीरित्या टोईंग केले. दोन्ही जहाजे सध्या गोव्याच्या दिशेने येत आहेत आणि २८ जुलै रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास मुरगाव बंदरावर पोहोचण्याची अपेक्षा आहे. सीएसआयआर-एनआयओ संशोधन जहाजावरील सर्व कर्मचारी सुरक्षित आहेत.