इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – तीन महिन्यांहून अधिक गर्भवती असलेल्या महिलांना बँकेत नोकरीसाठी इंडियन बँकेने तात्पुरते अपात्र ठरवले आहे. बँकेच्या या अजब निर्णयावर सर्वच स्तरातून टीकेची झोड उठविली जात आहे. अशाच प्रकारचा निर्णय यापूर्वी स्टेट बँकेने घेतला होता. तो वादग्रस्त ठरल्यानंतर अखेर बँकेने तो मागे घेतला होता. आता इंडियन बँकेने असा निर्णय घेऊन सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
इंडियन बँकेने घेतलेल्या निर्णयानुसार, नोकरी सुरू करण्यापूर्वी त्यांना नोंदणीकृत डॉक्टरांचे फिटनेस प्रमाणपत्र सादर करावे लागेल. परिणामी, अशा महिलांना रुजू होण्यास उशीर होईल आणि त्यामुळे ज्येष्ठताही गमावण्याची वेळ येईल. बँकेच्या या प्रतिगामी निर्णयावर विविध संघटनांकडून टीका होत आहे.
इंडियन बँकेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, १२ आठवडे किंवा त्याहून अधिक वयाची गर्भवती महिला तिला बाळाला जन्म देईपर्यंत नोकरीसाठी तात्पुरती अयोग्य समजली जाईल. निवडलेल्या पदावर नियुक्तीसाठी डिलिव्हरीच्या सहा आठवड्यांनंतर उमेदवाराची पुन्हा तपासणी केली जाईल. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना लिहिलेल्या पत्रात, ऑल इंडिया वर्किंग वुमेन्स फोरमने हे पाऊल भारतीय बँकेबद्दल प्रतिगामी आणि स्त्रीवादी विरोधी धारणा असल्याचे म्हटले आहे. यापूर्वी स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) देखील असाच आदेश जारी केला होता. मात्र, मोठ्या विरोधानंतर एसबीआयने ते मागे घेतले. त्यानंतर दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनीही एसबीआयला नोटीस बजावली होती.
एसबीआयनेही केला होता नियम
यापूर्वी स्टेट बँक ऑफ इंडियाने म्हणजेट SBI बँकेने महिला उमेदवारांच्या भरतीसाठी पात्रता निकषांमध्ये मोठा बदल केला होता. तीन महिन्यांपेक्षा जास्त गर्भवती महिलांना तात्पुरते अनफिट समजण्यात येईल असे जाहीर करण्यात आले होते. या अंतर्गत प्रसूतीनंतर चार महिन्यांत ती बँकेत रुजू होऊ शकते असेही स्पष्ट करण्यात आले होते. मात्र, या नियमानंतर वाद सुरू झाला. महिला आयोगानेही या नव्या नियमाची दखल घेत नोटीस पाठवली होती. त्यानंतर बँक अधिकाऱ्यांनी जारी केलेली मार्गदर्शक तत्त्वे आणि नियमांमधील बदल मागे घेतले होते.