नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सेनाभर्ती कार्यालय मुंबई यांच्यामार्फत भारतीय सेनेत भूदल भरतीसाठी 2023-24 या वर्षापासून अग्नीवीर भरती पद्धतीत बदल करण्यात आला आहे. त्यानुसार अग्निवीर तांत्रिक, लिपिक, जनरल ड्यूटी व ट्रेडसमन अशा विविध पदांची भरती करण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज सादर करावेत, असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ओंकार कापले यांनी कळविले आहे.
इच्छुक उमेदवारांनी www.joinindianarmy.nic.in या संकेतस्थळावर 15 मार्च 2023 पर्यंत रात्री 11.59 वाजेपावेतो ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे. लिपिक जनरल ड्यूटी पदासाठी 10 वी पास तर ट्रेडसमन पदासाठी 8 वी पास असणे आवश्यक आहे. अग्निवीर तांत्रिक, लिपिक, जनरल ड्युटी व ट्रेडसमन या पदांसाठी मुंबई शहर, मुंबई उपनगर, नाशिक, रायगड, पालघर, ठाणे, धुळे व नंदूरबार या जिल्ह्यांच्या उमेदवारांची भरती करण्यात येणार आहे.
अग्निवीर भरती पद्धतीत बदल केल्यानुसार पहिल्या टप्प्यात संगणकाद्वारे ऑनलाईन पद्धतीने लेखी परीक्षा होणार असून दुसऱ्या टप्प्यात लेखी परीक्षा पास झालेल्या उमेदवारांची शारीरिक चाचणी घेण्यात येणार आहे. या भरतीसाठी जिल्ह्यातील जास्तीत जास्त पात्र युवकांनी दिलेल्या मुदतीत ऑनलाईन अर्ज सादर करावेत, असे आवाहनही श्री. कापले यांनी केले आहे.
Indian Army Angneevir Recruitment Application Details