चेन्नई (तामिळनाडू) – भारतीय हवाई दलाचे हेलिकॉप्टर कुन्नूर परिसरात कोसळल्याची घटना समोर आली आहे. या हेलिकॉप्टरमध्ये एकूण १० प्रवासी होते. त्यात चिफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपीन रावत यांच्यासह त्यांचे कुटुंबिय व काही वरिष्ठ अधिकारी होते. या दुर्घटनेत ४ जण अतिगंभीर तर ३ जण गंभीर जखमी असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. हवाई दलाने या दुर्घटनेच्या वृत्तास दुजोरा दिला आहे.
भारतीय हवाई दलाने दिलेल्या माहितीनुसार, भारतीय हवाई दलाचे हेलिकॉप्टर Mi-17V5 ला कुन्नूर येथे अपघात झाला आहे. या हेलिकॉप्टरमध्ये सीडीएस बिपीन रावत प्रवास करीत होते. हे विमान कोसळले आहे. या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश हवाई दलाने दिले आहेत. जखमींना जवळच असलेल्या वेलिंग्टन रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहितीही समोर आली आहे. यासंदर्भात हवाई दलाने दिलेल्या माहिती व्यतिरीक्त अन्य माहिती सादर करण्यात आलेली नाही.
https://twitter.com/IAF_MCC/status/1468496444063576065?s=20
हेलिकॉप्टर कोसळताच तातडीने हवाई दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी बचावकार्य सुरू केले. हेलिकॉप्टरमधील सर्व प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढून सर्व जखमींना तातडीने उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. या हेलिकॉप्टरमध्ये रावत यांच्यासह त्यांचे कुटुंबियही असल्याचे सांगितले जात आहे. (बघा दुर्घटनास्थळाचा व्हिडिओ)
https://twitter.com/ANI/status/1468493903921770499?s=20
कोण आहेत बिपीन रावत
रावत यांनी भारतीय लष्कराचे प्रमुखपद भूषविलेले आहे. ते डिसेंबर २०१९ मध्ये त्यांचा लष्कर प्रमुख पदाचा कार्यकाळ संपला. त्यानंतर मोदी सरकारने त्यांची नियुक्ती सीडीएस या पदावर केली. हे पद पहिल्यांदाच निर्माण करण्यात आले आहे. कारगील हल्ला आणि मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर देशाच्या संरक्षणासाठी तज्ज्ञांनी काही शिफारशी केल्या होत्या. त्यात या पदाचा समावेश आहे. हवाई दल, नौदल आणि लष्कर अशा तिन्ही दलांमध्ये समन्वय ठेवणे आणि पंतप्रधानांसह संरक्षण मंत्र्यांना सल्ला देण्याचे काम सीडीएस यांचे आहे. संरक्षण क्षेत्रातील हे सर्वात वरचे पद आहे.