इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेले रशिया युक्रेन युद्ध अद्यापही थांबत नसल्याने जगभरात चिंतेचे वातावरण आहे त्यामुळे आता संयुक्त राष्ट्रसंघाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आंतरराष्ट्रीय न्यायालयाने रशियाला युक्रेनवर हल्ला करणे तात्काळ थांबवण्याचे आदेश दिले आहेत. रशियाच्या हल्ल्यानंतर युक्रेनने हे प्रकरण संयुक्त राष्ट्रांच्या सर्वोच्च न्यायालयात नेले. त्यानंतर ICJ ने रशियाच्या बाजूने आणि विरोधात मतदान करण्याचा निर्णय घेतला. पण सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे ICJ मध्ये भारताचे न्यायमूर्ती दलवीर भंडारी यांनीही रशियाच्या विरोधात मतदान केले. त्याचबरोबर अमेरिकेनेही ICJ च्या आदेशाचे स्वागत केले आहे.
आंतरराष्ट्रीय न्यायालयात, 13 न्यायाधीशांनी रशियाच्या विरोधात मतदान केले, तर केवळ दोघांनी बाजूने मतदान केले. या 13 न्यायाधीशांमध्ये भारतीय न्यायाधीश दलवीर भंडारी यांचाही समावेश होता. रशियाच्या बाजूने मतदान करणाऱ्या 2 न्यायाधीशांमध्ये उपराष्ट्रपती किरील गेव्हॉर्जियन (रशिया) आणि न्यायाधीश स्यू हॅनकिन (चीन) हे होते.
न्यायमूर्ती दलवीर भंडारी आंतरराष्ट्रीय न्यायालयात त्यांचा दुसरा कार्यकाळ पूर्ण करत आहेत. 2012 मध्ये ते पहिल्या टर्मसाठी निवडून आले, त्यानंतर 2018 पासून दुसरा टर्म चालू आहे. त्यांना भारताने पुन्हा नामनिर्देशित केले आणि यूके नामांकित न्यायमूर्ती ग्रीनवुड यांचा पराभव करून ICJ मध्ये त्यांनी आणखी एक टर्म जिंकला.
आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या आदेशानंतर, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी रशियाला आदेशाचे त्वरित पालन करण्याचे आवाहन केले. तसेच रशियाविरुद्धच्या आंतरराष्ट्रीय न्यायालयात युक्रेनने पूर्ण विजय मिळवला आहे. झेलेन्स्की म्हणाले की, या आदेशाकडे दुर्लक्ष केल्यास रशिया आणखी एकटे पडेल. ICJ ने आक्रमण तात्काळ थांबवण्याचे आदेश दिले आहेत, त्याचे रशियाने पालन केले पाहिजे. आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार हा आदेश बंधनकारक असल्याचे आयसीजेने म्हटले आहे.