इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नवी दिल्ली -नव्या संसद भवनातील आजचे पहिले सत्र ऐतिहासिक असल्याचे सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याबद्दल शुभेच्छा दिल्या. लोकसभा अध्यक्षांनी या पहिल्या सत्रात सभागृहाला संबोधित करण्याची संधी दिल्याबद्दल त्यांनी अध्यक्षांप्रती कृतज्ञतेची भावना व्यक्त केली आणि सर्व सदस्यांचे स्वागत केले. अमृत काळाच्या सुरुवातीला भविष्यकाळातील वाटचालीसाठी नव्या संसद भवनात आपण प्रवेश केला असून हा महत्त्वपूर्ण प्रसंग असल्याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधले.
देशाने अलिकडे मिळवलेले यश अधोरेखित करताना पंतप्रधानांनी चांद्रयान 3 आणि जी20 चे आयोजन व त्याचा जगावर पडलेला प्रभाव याचा उल्लेख केला. गणेश चतुर्थीच्या मंगल दिवशी संसद भवनाच्या नव्या वास्तूत कामकाजाला सुरुवात झाल्याचे सांगून पंतप्रधानांनी गणपती हे संपन्नतेचे, मांगल्याचे, कार्यकारण आणि ज्ञानाचे प्रतीक मानले जाते याकडे उपस्थितांचे लक्ष वेधले. अशा मंगल समयी संकल्प सिद्धीस नेण्याचा आणि नव्या प्रवासाची सुरुवात नव्या उत्साहात आणि ऊर्जेसह करण्याचा हा काळ सुरू झाल्याचे ते म्हणाले. गणेश चतुर्थीच्या दिवशी लोकमान्य टिळक आणि नव्या आरंभाचा उल्लेख करून पंतप्रधान म्हणाले की स्वातंत्र्य लढ्यात लोकमान्य टिळकांनी गणेश चतुर्थीच्या माध्यमातून देशभरात स्वराज्याची ज्योत प्रज्वलित केली, त्याच प्रेरणेतून आज आपण पुढे जात आहोत.
आज संवत्सरी पर्व अर्थात क्षमाशीलतेचा सण असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. कळत नकळत कुणी दुखावले गेले असेल तर क्षमायाचना करण्याचा आजचा दिवस आहे, असे ते म्हणाले. मिच्छामी दुक्कडम असे म्हणून या सणाच्या शुभेच्छा पंतप्रधानांनी दिल्या आणि गतकाळातील कटूता मागे सोडून पुढे जाण्याचे आवाहन केले.
जुन्या आणि नव्याला जोडणारा दुवा पवित्र सेंगोल हा स्वातंत्र्याच्या उदयाचा पहिला साक्षीदार असल्याचे पंतप्रधान म्हणाले. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा स्पर्श झालेला हा पवित्र सेंगोल आपल्याला भूतकाळातील महत्त्वाच्या भागाशी जोडणारा दुवा आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले. पंतप्रधान म्हणाले की, संसदेच्या या नवीन वास्तूमध्ये जणू अमृत काळामध्ये अभिषेक होत आहे. या वास्तूची उभारणी करण्यासाठी श्रमिक आणि अभियंत्यांनी केलेल्या कष्टाची आठवण होते. कोरोना महामारीच्या काळातही हे श्रमजीवी या इमारतीचे काम करत राहिले. पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण सभागृहाने या श्रमिकांसाठी आणि अभियंत्यांसाठी टाळ्यांचा कडकडाट केला. या इमारतीसाठी ३० हजारांहून अधिक श्रमिकांनी योगदान दिल्याची माहिती त्यांनी दिली आणि श्रमिकांची संपूर्ण माहिती असलेल्या डिजिटल पुसितका उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
आपल्या कृतींवर भावना आणि आपल्यामध्ये असलेली संवेदनशीलता यांचा परिणाम होत असतो, असे सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, आज आपल्या भावना, आपल्यामध्ये असलेली संवेदनशीलताच आपले आचरण कसे असावे, यासाठी मार्गदर्शन करतील. ते म्हणाले, “भवन (इमारत) बदलले आहे, आता आपले भाव (भावना) देखील बदलले पाहिजेत.”
“देशाची सेवा करण्यासाठी संसद हे सर्वोच्च स्थान आहे”, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. हे सभागृह कोणत्याही राजकीय पक्षाच्या फायद्यासाठी नाही. तर हे केवळ देशाच्या विकासासाठी आहे. सदस्य या नात्याने पंतप्रधान म्हणाले की, आपण आपले शब्द वापरताना, विचार आणि कृती करताना घटनेचा आत्मा जपला पाहिजे. प्रत्येक सदस्य सभागृहाच्या या अपेक्षा आणि आकांक्षा पूर्ण करेल आणि त्यांच्या सदनाच्या अध्यक्षांच्या मार्गदर्शनाखाली काम करेल, अशी ग्वाही पंतप्रधान मोदी यांनी सभापतींना दिली. पंतप्रधानांनी यावर भर दिला की, सभागृहातील सदस्यांचे वर्तन म्हणजे, असा घटक आहे की, सदस्य सत्ताधारी किंवा विरोधी पक्षाचा भाग आहेत, हे त्यावरून दिसून येते. कारण सर्व कार्यवाही जनतेच्या नजरेसमोर होत आहे.
सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी सामूहिक संवाद आणि कृतीच्या गरजेवर भर देत पंतप्रधानांनी उद्दिष्टांच्या एकतेवर भर दिला. “आपण सर्वांनी संसदीय परंपरांच्या लक्ष्मण रेषेचे पालन केले पाहिजे”, असे पंतप्रधान म्हणाले. समाजाच्या परिवर्तनामध्ये राजकारणाची भूमिका अधोरेखित करून, पंतप्रधानांनी भारतीय महिलांनी अंतराळापासून क्रीडापर्यंतच्या सर्व क्षेत्रामध्ये दिलेल्या योगदानाकडे सर्वांचे लक्ष वेधले. जी- 20 दरम्यान महिलांच्या नेतृत्वाखालील विकासाची संकल्पना जगाने कशी स्वीकारली याचे त्यांनी स्मरण केले. या दिशेने सरकारने उचललेली पावले सार्थ ठरत असल्याचे ते म्हणाले. पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, जन धन योजनेच्या 50 कोटी लाभार्थ्यांपैकी बहुतांश खाती महिलांची आहेत. मुद्रा योजना, पंतप्रधान आवास योजना, यांसारख्या योजनांमध्ये महिलांना मिळणाऱ्या लाभांचाही त्यांनी उल्लेख केला.
कोणत्याही राष्ट्राच्या विकासाच्या प्रवासामध्ये अशी वेळ येते की त्यावेळी इतिहासाची निर्मिती होत असते, असे नमूद करून पंतप्रधान म्हणाले की, आजचा प्रसंग हा भारताच्या विकासाच्या प्रवासातील असा क्षण आहे, ज्या क्षणाचा – वेळेचा इतिहास लिहिला जात आहे. महिला आरक्षणाविषयी संसदेत झालेल्या चर्चेवर प्रकाश टाकताना पंतप्रधानांनी सांगितले की, या विषयावरील पहिले विधेयक 1996 मध्ये पहिल्यांदा मांडण्यात आले होते. ते पुढे म्हणाले की, अटलजींच्या कार्यकाळात ते अनेकवेळा सभागृहात मांडण्यात आले होते. मात्र महिलांच्या स्वप्नांना सत्यात उतरवण्यासाठी आवश्यक तेवढा पाठिंबा त्यावेळी मिळवता आला नाही. “मला विश्वास आहे की, हे काम करण्यासाठी देवाने माझी निवड केली आहे”. असे सांगून पंतप्रधानांनी माहिती दिली की, केंद्रीय मंत्रिमंडळाने संसदेत महिला आरक्षण विधेयकाला मंजुरी देण्याचा निर्णय घेतला आहे. आजचा 19 सप्टेंबर 2023 चा हा ऐतिहासिक दिवस असून भारताच्या इतिहासात अमर होणार आहे. असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधोरेखित केले. प्रत्येक क्षेत्रात महिलांच्या वाढत्या योगदान महत्वपूर्ण आहे, असे सांगून, आता धोरणनिर्मितीमध्ये अधिकाधिक महिलांचा समावेश करण्याच्या गरजेवर पंतप्रधानांनी भर दिला. धोरण निश्चितीमध्ये महिलांना जास्तीत जास्त सहभागी करून घेतर तर, त्यांचे राष्ट्रासाठी योगदान अधिक वाढेल. या ऐतिहासिक दिवशी महिलांसाठी संधीची दारे खुली करण्याचे आवाहन त्यांनी लोकसभा सदस्यांना केले.
“महिलांच्या नेतृत्वाखालील विकासाचा संकल्प पुढे नेताना, आमचे सरकार आज एक मोठी घटनादुरुस्ती सूचविणारे विधेयक सादर करत आहे. लोकसभा आणि विधानसभांमध्ये महिलांचा सहभाग वाढवणे हा या विधेयकाचा उद्देश आहे. ‘नारीशक्ती वंदन अधिनियम’या विधेयकामुळे आपली लोकशाही आणखी मजबूत होईल. नारीशक्ती वंदन अधिनियमासाठी मी देशाच्या माता, भगिनी आणि मुलींचे अभिनंदन करतो. मी देशाच्या सर्व माता, भगिनी आणि मुलींना आश्वासन देतो की या विधेयकाचे कायद्यात रुपांतर करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. मी या सभागृहातील सर्व सहकाऱ्यांना विनंती करतो की, आज एक पवित्र, शुभ कार्याने प्रारंभ केला जात आहे, जर हे विधेयक सर्वसहमतीने कायदा बनले तर महिलांची शक्ती अनेक पटींनी वाढेल. त्यामुळे मी दोन्ही सभागृहांना संपूर्ण एकमताने विधेयक मंजूर करण्याची मी विनंती करतो”, या आवाहनाने पंतप्रधानांनी आपल्या भाषणाचा समारोप केला.