नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी नाशिक जिल्हा परिषदेत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.अर्जुन गुंडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली, या बैठकीमध्ये जिल्हा परिषदेतील विभागप्रमुख सर्व विभागातील सहायक प्रशासन अधिकारी, कनिष्ठ प्रशासन अधिकारी यांना राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियानाच्या अंमलबजावणीसाठी सूचना देण्यात आल्या. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) रवींद्र परदेशी, मुख्य लेखा व वित्त अधिकारी भालचंद्र चव्हाण, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) वर्षा फडोळ, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.संजय शिंदे, महिला व बालकल्याण विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी दीपक चाटे, बांधकाम ३ विभागाच्या कार्यकारी अभियंता अभियंता शैलजा नलावडे, बांधकाम २ विभागाचे कार्यकारी अभियंता पंकज मेतकर यांच्यासह सहायक प्रशासन अधिकारी व कनिष्ठ प्रशासन अधिकारी उपस्थित होते.
बदलत्या नवीन तंत्रज्ञानामुळे व जागतिकीकरणामुळे प्रशासनामध्येसुध्दा मोठया प्रमाणावर बदल करणे गरजेचे आहे. त्यानुसार प्रशासनातील सेवांच्या गुणवत्तेमध्ये वाढ, लोकाभिमुखता व निर्णयशीलता आणण्याकरिता तसेच सर्वांच्या सहकार्यातून उत्तम प्रशासन कार्यान्वित करण्याकरिता “राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान” राबवले जाते. मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियानाची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्याच्या सूचना दिल्या होत्या, त्यानुषंगाने आज अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.अर्जुन गुंडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली यावेळी त्यांनी सामान्य प्रशासन विभागाच्या शासन निर्णय १ फेब्रुवारी २०२१ च्या अनुषंगाने राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियानाच्या कार्यपद्धतीबद्दल माहिती देऊन हे सर्व विभागांच्या माध्यमातून कसे राबवता येईल याबद्दल मार्गदर्श केले. सहायक प्रशासन अधिकारी व कनिष्ठ प्रशासन अधिकारी यांनी देखील प्रशासकीय कामकाजात गतिमानता कशी आणता येईल याबद्दल संकल्पना मांडल्या.
सुंदर माझे कार्यालय अभियानाबद्दल देखील सूचना – शासनच्या विविध कार्यालयात कार्यरत असलेले अधिकारी व कर्मचारी यांचा एक तृतीयांश कालवधी हा कार्यालात जातो यावेळी कार्यालयातील वातावरण स्वच्छ, सुंदर व पोषक असल्यास त्यामुळे त्यांची कार्यक्षमता वाढून त्याचा फायदा निश्चितपणे प्रशासन आणि सामान्य जनेतला होतो यास अनुसरून सुंदर माझे कार्यालय हे अभियान सामान्य प्रशासन विभागाच्या शासन निर्णय १८ मे २०२१ च्या माध्यमातून राबवण्यात येते या अभियानाच्या तिसऱ्या टप्याची अंमलबजावणी १ सप्टेंबर ते ३० नोव्हेंबर या कालावधीत केली जाणार आहे याबद्दल जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ अर्जुन गुंडे यांनी माहिती देत राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियान व सुंदर माझे कार्यालय या अभियानाची सांगड घालून काम करण्याच्या सूचना उपस्थितांना केल्या.
The administrative work of ZP of Nashik will be dynamic