येवला (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सातासमुद्रापार नाव कमविलेल्या नाशिकच्या येवल्याच्या पैठणीची समस्त महिला वर्गाला भुरळ घालत असते, मात्र आज स्वराज पक्ष संघटनेच्या उद्घाटनासाठी येवला दौ-यावर असलेल्या छत्रपती संभाजीराजेंना पैठणीची भुरळ पडली.
येवला येथे पोहचण्यापूर्वी छत्रपती संभाजीराजे यांनी आंगणगाव येथील पैठणी कला केंद्राला भेट देत पैठणीची माहिती जाणून घेतली. येथील आकर्षक आणि सुंदर पैठणी साड्या पाहून त्यांनाही मोह आवरता आला नाही. त्यानंतर त्यांनी राणी साहेबांसाठी चक्क एक नाही दोन नाही तर १० ते १२ पैठणीच खरेदी केल्या.
नाशिक जिल्ह्यातील येवला शहर खास पैठणीसाठी ओळखले जाते. सौंदर्य खुलवणारे भरजरी वस्त्र म्हणून प्रसिद्ध असलेली पैठणी सोने व चांदीची जरी वापरून तयार करण्यात येते. त्यामुळे तिची किंमतही पाच हजार ते एक लाखाच्या घरात असते. जास्त भरजरी व कलाकुसरीची पैठणी करण्यासाठी दोन वषेर्ही लागतात. अशा या पैठणीच्या शहरात आज छत्रपती संभाजी राजे यांनी भेट देऊन पैठणी खरेदी केल्यामुळे येवलेकरांना आज आनंद झाला..
Chhatrapati Sambhaji Raje in yeola