इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
आगामी दिनांक १५ ऑक्टोबर रोजी शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात होत असून महाराष्ट्र मध्ये साडेतीन शक्तीपीठाचा दर्जा असलेले कोटमगाव येथील स्वयंभू जगदंबा माता मंदिर श्रीक्षेत्र कोटमगाव येथे अनाधिकालापासून सुरू असलेल्या परंपरेचा यात्रा उत्सव भरणार असून संपूर्ण येवला तालुक्यासह नाशिक नगर, खानदेश, औरंगाबाद जिल्ह्यातील लाखो देवी भक्तांसाठी जगदंबा माता देवस्थान तर्फे यात्रेची तयारी सुरू झाली आहे.
कोटमगाव देवस्थान ट्रस्ट भाविकांच्या सुख सुविधा साठी सज्ज होत आहे मंत्री छगन भुजबळ यांच्या आमदार निधीतून रेल्वे उड्डाण पूल ते कोटमगाव पर्यंत नव्यानं स्ट्रीट लाईट बसवण्याची व्यवस्था युद्ध पातळीवर सुरू आहे, घटी बसणाऱ्या भाविकांसाठी भक्तनिवास, ग्रामपंचायत हॉल,तसेच फराळाची व्यवस्था करण्यात येणार आहे तसेच यात्रा काळात कुठल्याही प्रकारची रोगराई पसरू नये यासाठी महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग तसेच एस एन डी कॉलेज वैद्यकीय विभाग यांच्या वतीने तात्पुरते स्वरूपात आरोग्य केंद्र सुरू करण्यात येणार आहे.
येवला शहर पोलिसांच्या वतीने यात्रा उत्सव काळात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये व गर्दी नियंत्रणात राहावी यासाठी अतिरिक्त बंदोबस्ताची व्यवस्था करण्यात आली असून तसेच सर्व परिसरावर सीसीटीव्हीचे नियंत्रण असणार आहे. यात्रे दरम्यान एस एस मोबाईल येवलाचे संचालक सुदर्शन खिल्लारे यांच्या वतीने मोफत रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली जाणार असल्याची माहिती अध्यक्ष रावसाहेब कोटमे यांच्या वतीने देण्यात आली आहे.