येवला (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मराठा आरक्षणासाठी येवला तालुक्यातील सोमठाणा देश येथे लासलगाव- येवला रस्ता रोको करत मोर्चा काढण्यात आला. मोर्चामध्ये सरकारची प्रतीकात्मक तिरडी काढण्यात आली. या तिरडीला तरुणांनी चपलांनी हवा देत जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर तिरडीला चपलांनी बडवण्यात आले. या मोर्चामध्ये भजन कीर्तन म्हणत मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी जोरदार घोषणाबाजी केली.
ग्रामपंचायतीसमोर आल्यानंतर सरकारच्या प्रतिकात्मक तिरडीचे दहन करत बोंबा मारण्यात आल्या. यावेळी या मोर्चासाठी शालेय विद्यार्थी विद्यार्थिनीं मोठ्या प्रमाणात उपस्थितीत होते. यावेळी मराठा समाजाच्या आरक्षणाची दखल न घेतल्यास यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. त्याचबरोबर मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत मतदानावर बहिष्कार, राजकीय लोकप्रतिनिधींना सोमठाणा देश गावामध्ये गाव बंदीचा ठराव मंजूर करण्यात आला.
मराठा आरक्षणासाठी जालना जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांपासून मनोज जरंगे पाटील यांचे मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण सुरू असून राज्य सरकारकडून पाहिजे तशी दखल घेतली जात नसल्याने आता शहरी भागानंतर ग्रामीण भागातील ही मराठा समाज आक्रमक झाल्याचे चित्र येवला तालुक्यातील सोमठाणा देश येथे पाहायला मिळाले.
Agitation for Maratha Reservation in Yeola Taluka