येवला (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी गणेशोत्सवानिमित्त पुरणगाव येथील मुन्ना शेख यांच्या घरी सदिच्छा भेट दिली. यावेळी शेख यांच्या घरी विराजमान झालेल्या श्री गणेशाचे पूजन करत दर्शन घेतले. यावेळी कुटुंबीयांशी संवाद साधून गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, गणेश उत्सवाच्या माध्यमातून मुन्ना शेख यांनी हिंदू मुस्लिम ऐक्याची परंपरा कायम जोपासली आहे. त्यांचं व त्यांचं कुटुंबाच हे सामाजिक ऐक्याचे काम अतिशय कौतुकास्पद आहे. यापुढील काळातही त्यांचं हे काम सुरू राहील असे सांगत त्यांना या उपक्रमाबद्दल शुभेच्छा दिल्या. यावेळी उपविभागीय अधिकारी बाबासाहेब गाढवे,प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे,प्रा.ज्ञानेश्वर दराडे यांच्यासह शेख कुटुंबातील सदस्य, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
गणपती बाप्पावर श्रध्दा
येवला तालूक्यातील पुरणगाव येथे गेल्या सात वर्षापासून मुन्ना शेख आपल्या घरात श्रीगणेशाची स्थापना करत आहे. त्याचा हा भक्तीभाव सर्वांच्या कौतुकाचा विषय ठरला आहे. विशेष म्हणजे त्याच्या या भक्तीला समाजानेही विरोध केला नाही व घरातल्या वडिलधा-यांकडून कोणी आक्षेप घेतला नाही. गणेशाची स्थापना करणारा मुन्ना शेख हा धर्माने मुस्लीम समाजाचा असला तरी त्याचे मित्र सर्वधर्मीय आहे. त्याचा फोटोग्राफीचा व्यवसाय असल्यामुळे त्यांचे सर्वांचे स्नेहाचे संबधही आहे. त्यामुळे त्याला देव सारखेच वाटतात. त्यामुळे त्याने गावातील उजव्या सोंडीच्या नवसाला पावणा-या सिध्दीविनायकाला एक नवस केला होता. त्याला देवही पावला. त्यानंतर त्याची गणपती बाप्पावर श्रध्दा वाढत गेली. आता तर तो दरवर्षी घरी श्रीगणेशाची स्थापना कुटुंबासह करतो. मुन्ना शेख या भक्तीबाबत सांगतो, मी सर्वधर्म समभाव मानतो, देव कुठलाही असो तो सर्वत्र सारखाच आहे अशी माझी भावना आहे.