इंडीया दर्पण ऑनलाईन डेस्क –
मुंबईत आज द. आफ्रीका संघाने बांग्लादेशचा १४९ धावांनी पराभव केला. सलामीवीर क्विंटन डिकॉक १७४ धावांची धुवांधार खेळी आणि हायनेरीक क्लासेनच्या अवघ्या ४९ चेंडूतल्या ९० धावा यामुळे आज देखील द. आफ्रीका एक मोठी धावसंख्या उभारण्यात यशस्वी ठरला. हा संघ सध्या या स्पर्धेत धावांचा डोंगर उभा करतोय. सलामीच्या श्रीलंकेविरूध्दच्या सामन्यात द.आफ्रीकेच्या धुरंधर फलंदाजांनी ४२८ धावांचा हिमालय उभाकरून सामना जिंकला होता. त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरूध्द द. आफ्रीकेने ३११ धावा केल्या.
तिस-या सामन्यात नेदरलॅण्ड विरूध्द हा संघ आश्चर्यकारक रित्या पराभूत झाला. परंतु हा संघ डगमगला नाही. इंग्लडविरूध्दच्या सामन्यात याच द. आफ्रीकेने ३९९ धावा केल्या. ही मोहीम आजही या संघाने मुंबईत कायम राखली आणि त्यांच्या उर्वरीत सामन्यांसाठी त्यांनी विरुध्द संघाला एक धोक्याचा अलार्म दिला आहे. या ४ विजयी सामन्यांपैकी श्रीलंका, इंग्लड आणि ऑस्ट्रेलिया या संघानी नाणेफेक जिंकून द. आफ्रीकेला प्रथम फलंदाजी दिली होती. आज देखील द. आफ्रीकेने नाणेफेक जिंकली आणि फलंदाजीचा निर्णय घेतला.
यावरून द.आफ्रीकेचा इरादा एकदम स्पष्ट झाला आहे. प्रथम फलंदाजी करून भरपूर धावा जमवायच्या. प्रतिस्पर्धी गोलदांजावर कुठलाही दबाव न बाळगता तुटून पडायचं आणि फलंदाजीसाठी पोषक असलेल्या भारतीय खेळपट्यांवर ३५० ते ३७० च्या आसपास मोठ्या धावसंख्येला टारगेट करायचं हा यंदाच्या विश्वचषक जिंकण्याच्या मोहीमेसाठी द.आफ्रीकेचा प्लॅन दिसून येतो आहे. आकडेवारी बोलकी आहे. द.आफ्रीका हा एकमेव संघ आहे ज्यांचा नेट रनरेट २.३७ इतका जबरदस्त आहे. त्याखालोखाल न्युझीलंड (१.४८) आणि भारत (१.३५) यांचा क्रमांक लागतो.
आजचा सामना तर पुर्णपणे एकतर्फी झाला. अपेक्षा देखील तीच होती. द. आफ्रीकन फलंदाजांच्या हातातली बॅट इतकी वेगाने फिरत होती की बांग्लादेशला त्यांच्या विरुध्द ७ गोलंदाज वापरून बघावे लागले, परंतु उपयोग झाला नाही. मेहंदी हसन मिराजचा अपवाद वगळला तर एकाही गोलंदाजाला ५ च्या आत इॅकॉनॉमी रेट बाळगता आला नाही यातच सर्व काही स्पष्ट होते. मुस्तफिजुर रहेमान आणि शाकिब अल हसन या प्रमुख गोलंदाजांची गोलंदाजी देखील आज या फलंदाजांनी फोडून काढली.
या आव्हानाला उत्तर देण्यासाठी बांग्लादेशचे फलंदाज मैदानात उतरले त्यावेळीच सामना जिंकण्याच्या आशा धुसर झालेल्या होत्या. ३० या धावसंख्येवर पहिली आणि ५८ या धावसंख्येवर पाचवी विकेट गमावल्यानंतर बांग्लादेशने हातपाय गाळल्याचेच लक्षात आले. महेमूदूल्लाने एकाकी लढत दिली. परंतु, खेळपट्टीवर त्याला दुसरीकडून मतद मिळालीच नाही आणि व्यक्तीगत शतक नोंदविण्याशिवाय महेमूदूल्ला फारसे काहीच करू शकला नाही.
आता उद्या ऑस्ट्रेलिया आणि नेदरलॅण्ड यांच्यात लढत होईल
Bangladesh defeated…now South Africa has a plan to win the World Cup