इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
बगदाद : इराक हा पश्चिम आशियातील महत्त्वाचा देश असून इराक- इराण युद्धामुळे अनेक वर्ष या देशाला संघर्ष सहन करावा लागला. त्यातच सद्दाम हुसेन राजवटीमुळे या देशाला प्रचंड प्रमाणात नुकसान सहन करावे लागले. मात्र आता हा देश पुन्हा एकदा नव्याने उभा राहत असून या देशाचे नाव जगाच्या नकाशावर घेतले जात आहे. मात्र गेल्या काही दिवसात या देशात अनेक बऱ्या- वाईट घटना घडताना दिसून येत आहेत. त्यातच आता लग्नसमारंभात लागलेल्या आगीत वधू वरासह सुमारे १०० हून अधिक वऱ्हाडी मंडळीचा मृत्यू झाल्याची प्राथामिक माहिती समोर आली आहे.
रात्रीच्या अंधारात घडला भयानक प्रकार
इराकच्या उत्तर निनेवे प्रांतातील अल-हमदानिया जिल्ह्यात मंगळवार, २६ सप्टेंबर रोजी एका लग्नसोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला वधू आणि वराकडील हजारो वऱ्हाड्यांची उपस्थिती होती. लग्न लागताच काही लोकांनी हॉलबाहेर फटाके फोडण्यास सुरुवात केली. यातील एक फटाका लग्नाचा मंडपात येऊ फुटला. त्यामुळे क्षणात मंडपाला आग लागली. बघता-बघता आगीने रौद्ररुप धारण केले. सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली. आग लागल्याने विजेते दिवेदेखील बंद झाले त्यामुळे रात्रीच्या अंधारात सर्वत्र धावपळ आणि गोंधळ सुरू झाला त्यातच आग आणखीन पसरल्याने मोठ्या प्रमाणावर जीवित हानी झाल्याचे समजते. या घटनेने मोठी हळहळ व्यक्त होत आहे. नेमकी ही आग कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही, मात्र फटाके पेटवल्यानंतर आग लागल्याचे सांगण्यात येते.
आनंदाच्या क्षणी दुःखाचा कोसळला डोंगर
लग्न सोहळा म्हणजे आनंदाचा क्षण मात्र या आनंदाचे क्षणाचे अगदी क्षणात दुःखात रूपांतर झाले. कारण हा लग्नसोहळा सुरू असताना अचानक एका हॉलमध्ये भीषण आग लागली. या आगीत वधू वरासह जवळपास १०० हून अधिक वऱ्हाड्यांचा मृत्यू झाल्याची प्राथामिक माहिती आहे. तर जवळपास १५० जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. या लग्न मंडपात अत्यंत ज्वलनशील वस्तू होत्या. त्यामुळे आगीने भीषण रुप धारण केले. त्याचबरोबर कमी किमतीच्या बांधकाम साहित्याचा वापर केल्यामुळे हॉलचा काही भाग कोसळला. त्याखाली दबून १०० हून अधिक वऱ्हाडी होरपळले. त्यांना बाहेर पडता आले नाही यामध्ये वधू आणि वराचा देखील समावेश आहे.
दरम्यान, आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान तसेच स्थानिक अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. आगीत होरपळलेल्या वऱ्हाड्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले. दरम्यान, इराकचे पंतप्रधान मोहम्मद शिया अल सुदानी यांनी या दुर्घटनेबद्द्ल तीव्र दु:ख व्यक्त केले असून दुर्घटनेत जखमी झालेल्या लोकांना मदत देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच या घटनेची चौकशी करण्यात येत आहे.
More than 100 killed in firefight at wedding ceremony