इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबई – संपूर्ण राज्याला पावसाच्या जबरदस्त तडाख्याने हैराण करून सोडल्यानंतर आता ऑक्टोबर महिन्यातील उकाड्याचा सामना करावा लागणार आहे. यासंदर्भात हवामान खात्याने अलर्ट जारी केला असून या काळात लोकांना प्रकृतीची काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
‘ऑक्टोबर हिट’मुळे विविध आजारांचे प्रमाण वाढत असते. विशेषतः व्हायरलचा प्रकोप वाढत असतो. सध्या महाराष्ट्र डेंग्यूचा सामना करीत असताना ऑक्टोबर हिटमुळे पुन्हा एकदा दवाखान्याचा मार्ग धरण्याची वेळ नागरिकांवर येऊ शकते असा अंदाज आहे. दरम्यान, हवामान तज्ज्ञांनी देखील पुढील दहा दिवस उष्णतेचे असणार आहेत, असे म्हटले आहे. पुढील दहा राज्याला ऑक्टोबर हिटच्या झळा जाणवतील, त्यानंतर हळूहळू तापमानात घट होईल, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे.
यंदा मोसमी वारे वेळेत माघारी गेले असले तरीही, मागील चार-पाच वर्षांच्या तुलनेत यंदा १४ दिवस अगोदर मोसमी वारे राज्यातून माघारी गेले आहे. त्यामुळे हवेतील बाष्पाचे प्रमाण कमी झाले आहे. सूर्याची किरणे थेट जमिनीवर पडत आहेत. सध्या सूर्य विषुववृत्तावर असल्यामुळे भारतीय उपखंडाला जास्त उष्णता मिळत आहे. मोसमी वाऱ्याच्या माघारीनंतर राज्यावर हवेच्या जास्त दाबाची (अॅन्टी सायक्लॉन) स्थिती तयार झाली आहे, या स्थितीत ढगांची निर्माती होत नाही. त्या शिवाय देशातील वातावरणावर ऑगस्टपासून एल-निनोचा प्रभाव दिसून येत आहे. या सर्वांचा परिणाम म्हणून ऑक्टोबर हीटच्या झळा अधिक तीव्र झाल्या आहेत. पुढील दहा दिवस अशीच स्थिती राहण्याचा अंदाजही हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
थंडीसाठी काही दिवस प्रतीक्षा
विदर्भातील तापमान सरासरी ३५ अंशांवर गेले आहे. मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्रात पारा सरासरी ३४ अंशांवर आणि मुंबईसह कोकणात तापमान सरासरी ३३ अंश सेल्सिअसवर आहे. पुढील दहा दिवस ‘ऑक्टोबर हिट’च्या झळा बसणार आहेत. तापमानात सरासरी एक-दोन अंश सेल्सिअसची वाढ होऊ शकते. त्यानंतर तापमानात हळूहळू घट होऊन थंडीची चाहूल लागेल, असे हवामान तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
Will it rain or will the heat burn the body? This is the weather forecast