नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – वणी पोलीस ठाणे हद्दीतील खेडले गावात मामाचा भाच्यानेच केला घात केल्याच्या उलगडा पोलिसांनी केला आहे. या घटनेत भाज्यासह एकाला अटक करण्यात आली आहे. संदीप हरी मेधने वय ४१ वर्ष, या अपंग इसमाचा मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत घराबाहेर पडला आहे, अशी माहिती ११ सप्टेंबर रोजी रात्री उशीरा वणी पोलीस स्टेशनला प्राप्त झाली होती. त्यानंतर या घटनेचा तपास करत असतांना हा खूनाचा प्रकार समोर आला आहे.
या घटनेबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, या घटनेची माहिती मिळ्यानंतर वणी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश बोडखे हे तातडीने घटनास्थळी रवाना झाले. सदर मयत हा आपल्या आईसह खेडले येथे राहत असल्याचे दिसून आले. मयताचे डोक्यात मारहाणीच्या जखमा दिसून आल्या तसेच अंगावर पेट्रोलजन्य पदार्थ टाकून त्यास जाळण्याचा प्रयत्न झाल्याने त्याचा कमरेचे वरील भाग ब-यापैकी जळून प्रेत विद्रूप झाले होते.
सदर घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक श्रीमती माधुरी कांगणे केदार व उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बांबळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्याचप्रमाणे श्वानपथक, ठसे तज्ञ व न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा येथील तज्ञांना देखील पाचारण करण्यात आले. पोलीसांना घटनास्थळावर दारूच्या रिकाम्या दोन बाटल्या व एक पेट्रोलची कॅन अशा वस्तू आढळून आल्या. यावरून मयताचे सोबत आणखी कोणीतरी दारू पिण्यासाठी आला असावा, अशी खुपगाट पोलीसांनी बांधली व याविषयी अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला असता, घटनेच्या दिवशी रात्री मयताचा भाचा किरण शरद कदम, वय २० वर्ष रा. कोराटे, तालुका दिंडोरी हा आणखी एका इसमासोबत आला होता, अशी माहिती मिळाली.
असा झाला खूनचा उलगडा
पोलीसांनी प्रथमता किरण शरद कदम यास त्याच्या राहते गावातून ताब्यात घेतले. त्यास बारकाईने विचारपूस करता त्याचे सोबत नामदेव रामदास वायकंडे, वय ३६ वर्ष, रा. कोराटे तालुका दिंडोरी हा देखील आला असल्याची कबुली त्याने दिली. घटनेच्या दिवशी दोघांनीही मयतासोबत दारू पिली. यादरम्यान मयत व किरण यांच्यात किरकोळ बाचाबाची झाली व यातूनच किरण याने चिडून कोयत्याने वार केले. मात्र कदाचित एवढ्याने मामा लवकर मरणार नाही असे वाटल्यावरुन, किरण याने सोबत आणलेल्या पेट्रोलच्या कॅनमधील काही पेट्रोल मयताचे अंगावर टाकून त्यास पेटवून दिले व उर्वरित पेट्रोल स्वत:चे गाडीत भरून ते दोघेही घटनास्थळावरून पसार झाले, अशी माहिती तपास दरम्यान पुढे येत आहे. यातील आरोपी किरण शरद कदम याचेविरुद्ध दिंडोरी व वडनेर भैरव पोलीस ठाणेस चोरीचे गुन्हे देखील दाखल आहेत.
या पथकाची कामगिरी
नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक शहाजी उमाप, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती माधुरी कांगणे केदार, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. संजय बांबळे यांनी केलेले मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे वणी पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक निलेश बोडखे, पोउनि व्ही. एस. कोठावळे, पोउनि महेश शिंदे, पोहवा धनंजय शिलावटे, पोना युवराज खांडवी, कुणाल मराठे, बंडू हेंगडे, श्रीकांत गारूंगे, पोकॉ सुनिल ठाकरे, रमेश चव्हाण, योगेश राठोड, प्रविण भोईर यांचे पथकाने वरील खूनाचा गुन्हा उघडकीस आणला आहे.
Vani’s murder was solved