इंडिया दर्पण ऑनलाईन डे्क
मुंबई : आयकर विभागाने उत्तर प्रदेशातील कानपूर येथील मयूर समुहावर छापा टाकला आहे. या छाप्यात कोट्यवधीची संपत्ती आढळली आहे.
मयूर समुहावरील आयकर छाप्याने चांगलीच खळबळ माजविली आहे. प्राप्त माहितीनुसार, १५० अधिकाऱ्यांनी ३५ हून अधिक ठिकाणी ही कारवाई केली, यामध्ये एकूण २६.३०७ किलो वजनाचे दागिने सापडले. त्यापैकी १५.२१७ किलोग्राम जप्त करण्यात आले आहे. त्यांची किंमत सुमारे ८ कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. याशिवाय ४.५३ कोटी रुपयांची रोकड सापडली असून त्यापैकी ३.७ कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत. साउथ एशियन फ्री ट्रेड एरियामध्ये ४१ कोटी रुपयांची ड्युटी चोरीही आढळून आली आहे. याबाबत विभागाच्या अधिकाऱ्यांनी ग्रुप मालकाची अनेक तास चौकशी केली. याशिवाय मेसर्स केपीईएलकडून १८ कोटी रुपयांची बनावट खरेदी उघडकीस आली.
या संदर्भात आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी कागदपत्रांसह समूहाच्या मालकाची चौकशी केली. रोख रक्कम आणि सोने वेगवेगळ्या खोल्यांमध्ये ठेवण्यात आले होते. त्या सर्व खोल्यांच्या चाव्या अशा ठिकाणी ठेवण्यात आल्या होत्या की, अधिकाऱ्यांना त्या शोधणे कठीण झाले होते. ज्या खोलीत जास्तीत जास्त रोकड सापडली त्या खोलीची चावी फ्लॉवर पॉटमध्ये लपवून ठेवलेली सापडली. डेटा राखण्यासाठी हायटेक सॉफ्टवेअरचा वापर करण्यात आला. मयूर ग्रुपने डेटा राखण्यासाठी हायटेक सॉफ्टवेअरचा वापर केला आहे, जो इन्कम टॅक्स विभागाच्या फॉरेन्सिक टीमने फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवला आहे.
लॅपटॉप, इतर वस्तूंची तपासणी
जप्त केलेला लॅपटॉप आणि इतर उपकरणांची तपासणी करण्यात येत आहे. यानंतर इतर करचोरी आणि अनियमिततेचा तपशील समोर येईल आयकर सूत्रांच्या माहितीनुसार, हजारो कोटी रुपयांची गुंतवणूक रिअल इस्टेटमध्ये करण्यात आली. करचुकवेगिरीसाठी बोगस खरेदी करण्यात आली. ज्या कंपन्यांकडून कोट्यवधींची खरेदी दाखविली जाते त्या प्रत्यक्षात अस्तित्वात नाहीत. हे छापे आणखी एक-दोन दिवस सुरू राहतील, असंही सांगण्यात येत आहे.
Income tax department raided the businessman’s house