इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
तुळजापूर – देवस्थानांकडे असलेल्या दागिन्यांची आणि रोखीची कायमच चर्चा होत असते. मग ते शिर्डी असो, पद्मनाभ स्वामी मंदिर असो, सोमनाथ मंदिर असो वा मग तुळजाभवानी किंवा पंढरपूरचे मंदिर असो. दरवर्षी या रोखीची आणि दागिन्यांची मोजणी होत असते आणि त्याची माहिती पुढे आली की त्यावर चर्चा घडत असते.
सध्या तुळजापूर देवस्थानही अशाच एका कारणाने चर्चेत आहे. प्रत्येक देवस्थानात दरवर्षी दागिन्यांची मोजणी किंवा मूल्य तपासण्याचे काम होतच असते असे नाही. पण काही अंतराने नक्कीच होत असते. त्याचप्रमाणे तुळजापूरच्या तुळजाभवानी देवस्थानातील दागिन्यांची व सोने-चांदीची मोजणी जवळपास साडेचौदा वर्षांनंतर करण्यात आली. ही मोजणी अलीकडेच पूर्ण झाली आहे. यामध्ये जवळपास ६० कोटी रुपये किंमतीचे सोने देवस्थानाला भक्तांकडून प्राप्त झाल्याचे उघड झाले आहे.
आता सोने-चांदी किंवा इतर जडजवाहिरांचे देवस्थान काय करणार, त्यामुळे ते वितळविण्याच्या दृष्टीने प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी विधी व न्याय विभागाकडे परवानगी मागण्यात आली. विभागाने ही परवानगी दिली असून आता ६० कोटी रुपये मूल्याचे सोने लवकरच वितळविण्यात येणार आहे. आता पुढची प्रक्रिया म्हणून मंदिर व्यवस्थापन रिझर्व्ह बँकऑफ इंडियाकडे सोने वितळवून देण्यासाठी अर्ज करेल. त्यानंतर अतिशय कडक सुरक्षेत त्याची रवानगी संबंधित ठिकाणी होईल. या संपूर्ण प्रक्रियेकडे सर्वसामान्यांचेही लक्ष लागलेले आहे.
२०७ किलो सोने
या मोजणीत २०७ किलो सोने आणि २५७० किलोच्या चांदीच्या वस्तू आढळल्या आहेत. आता खडे, डाग अशी विभागणी झाल्यानंतर ५५ ते ६० टक्के शुद्ध सोने मिळेल, असा अंदाज व्यक्त होत आहे. यातील जवळपास १२० किलो सोने शुद्ध निघेल असा विश्वास व्यवस्थापनाला असून त्याचे बाजारमूल्य ६० कोटी रुपये आहे.
So many crores of gold to Tuljabhavani temple