सोलापूर ( इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यात जालना येथील लाठी चार्ज घटनेनंतर मराठा आंदोलक पेटलेले असतानाच आता धनगर समाजही आरक्षणासाठी आक्रमक झाला आहे. सोलापूर येथे थेट पालकमंत्री असलेल्या राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अंगावर भंडारा उधळून आंदोलकांनी जाहीर निषेध नोंदवला आहे. सोलापूरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे आज सोलापूर दौऱ्यावर असतांना ही घटना घडली. या घटनेनंतर आता मंत्री विखे-पाटील यांची प्रतिक्रीया आली आहे.
विखेपाटील हे रेस्ट हाऊसमध्ये थांबले असतांना येथे धनगर समाजातील आंदोलक आले. त्यांनी निवेदन द्यायचे आहे असे सांगून भेट मागितली.. त्यानंतर विखे पाटील यांनी आंदोलकांना येण्याची परवानगी दिली. हे कार्यकर्ते येताच विखे पाटील यांनी त्यांना नमस्कार केला. आणि तुमचं काय म्हणणं आहे ? अशी विचारणा केली. त्यावेळी धनगर समाजातील आंदोलक शेखर बंगाळे यांनी विखे पाटील यांना निवेदन दिले. त्यानंतर बंगाळे यांनी खिशातून पुडी काढत विखे पाटील यांच्या अंगावर भंडारा उधळला. त्यामुळे विखे पाटील यांच्या अंगावर संपूर्ण हळद पसरली.
ही घटना घटल्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी बंगाळे यांना जोरदार मारहाण केली. त्यावेळी बंगाळे व त्यांचे समर्थकांनी येळकोट येळकोट जय मल्हार आणि ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागला नाही पाहिजे, अशा घोषणा दिल्या. यावेळी विखे पाटील यांनी मारु नका असे कार्यकर्त्यांना सांगितले.
ही घटना घडल्यानंतर शेखर बंगाळे यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले की, आम्ही आज भंडारा उधळला आहे. आमचा निषेध नोंदवला आहे. धनगर समाजाला अजूनही आरक्षण देण्यात आलेले नाही. आम्हाला आरक्षण नाही दिले तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या तोंडाला काळे फासल्याशिवाय राहणार नाही.
विखे-पाटील म्हणाले
या घटनेनंतर पालकमंत्री विखे-पाटील यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रीया दिली आहे. ते म्हणाले की, पवित्र भंडाऱ्याची माझ्यावर उधळण झाल्याने मला आनंदच… भंडारा उधळणाऱ्यांवर कोणतीही कारवाई नको. धनगर आरक्षणा संदर्भातील कृती समितीच्या भावनांबद्दल सरकार संवेदनशील आहे. आजवर सरकारने अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. कार्यकर्त्यांनी त्यांना मारहाण केली ती उत्स्फुर्त प्रतिक्रीया होती, असेही विखे-पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
The Solapur Dhankar Kriti Samiti threw up a bhandara on the Vikhe Patil