निधीसाठी प्रस्ताव लवकरच केंद्राकडे जाणार : खा. गोडसे
सिन्नर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यातील तीन नदी जोड प्रकल्पांना काल औरंगाबाद येथे झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली असून या प्रकल्पांसाठी चौदा हजार कोटींची गुंतवणूक करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.या तीन नदीजोड प्रकल्पात सिन्नर तालुक्याचा दुष्काळी तालुका हा कलंक कायमचा पुसल्या जाणाऱ्या दमनगंगा – अप्पर वैतारणा – कडवा -देवलिंग या नदीजोड प्रकल्पाचा समावेश आहे.दमणगंगा -अप्पर वैतरणा – कडवा – देवलिंग या नदीजोड प्रकल्पास आता लवकरच राज्यस्तरीय तांत्रिक समितीची मान्यता मिळणार असून निधी उपलब्धतेसाठी नदीजोड प्रकल्पाचा प्रस्ताव केंद्राकडे सादर केला जाणार असल्याची माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी दिले आहे.
सिन्नर तालुका वर्षानुवर्षे दुष्काळी तालुका म्हणुन प्रसिद्ध आहे. यामुळे या तालुक्यात कायमच पिण्याच्या,सिंचनाच्या आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्न असतो. या तालुक्यातील पाणी टंचाईचा प्रश्न कायमचाच निकाली निघावा यासाठी खा.हेमंत गोडसे यांनी गेल्या काही वर्षांपासून शासन दरबारी प्रयत्न सुरू केले होते. वैतरणा खाडीतुन समुद्रात वाहुन जाणारे पाणी आडवुन सदर पाणी गोदावरी खोऱ्यात टाकल्यास सिन्नर तालुक्यासाठी साडे सहा टी एम सी पाणी उपलब्ध होवु शकेल हे खा.गोडसे यांनी जलचिंतन संस्थेचे अध्यक्ष इंजि.राजेंद्र जाधव यांच्या सहकार्याने राज्य शासनाच्या वेळोवेळी निदर्शनास आणुन दिले.याकामी आमदार माणिकराव कोकाटे यांनीही मागील सरकारच्या काळात जलसंपदा मंत्री नामदार जयंत पाटील यांच्याकडे पाठपुरावा केला होता.शासनाने काही दिवसांपूर्वी नॅशनल वॉटर डेव्हलपमेंट ॲथोरिटीन (NWDA) या कंपनीकडून प्रस्तावित अप्पर वैतरणा – कडवा – देवलिंक नदीजोड प्रकल्पाचे सर्वेक्षण आणि डिपीआर तयार करून घेतला होता.
कंपनीने नदीजोड प्रकल्पाचा साडेसात हजार कोटींचा अंतिम अहवाल पंधरा दिवसांपूर्वीं शासनाला सादर केला होता.काल औरंगाबाद येथे झालेल्या कॅबिनेट बैठकीत दमणगंगा -अप्पर वैतरणा – कडवा – देवलिंक या नदीजोड प्रकल्पासह दमनगंगा -एकदरा -गोदावरी आणि पार -कादवा-गोदावरी नदीजोड प्रकल्पांना मान्यता देण्यात आली असून या प्रकल्पांसाठी चौदा हजार कोटींची गुंतवणूक करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,अजित पवार आदीसह सर्वच मंत्रीगण उपस्थित होते.वरील तीनही नदीजोड प्रकल्पांमुळे चौदा टीएमसी अधिकचे पाणी उपलब्ध होणार असून याचा फायदा नासिक,नगर आणि मराठवाड्याला होणार आहे.
अप्पर वैतारणा -कडवा -देवलिंक या प्रकल्पास राज्य सरकारने मान्यता दिल्यामुळे आता लवकरच या प्रकल्पास राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समितीची मान्यता मिळणार असून सदर प्रकल्पाचा प्रस्ताव निधीसाठी केंद्र शासनाकडे जाणार असल्याची माहिती खा.गोडसे यांनी दिली आहे. आता दमनगंगा -अप्पर वैतारणा -कडवा -देवलिंक या महत्वकांक्षी प्रकल्पाची प्रतिक्षा लवकरच संपणार असून प्रकल्पाचे प्रत्यक्ष काम सुरू होवून येत्या काही वर्षात सिन्नर तालुका सुजलाम सुफलाम होणार असल्याचा विश्वास खा. गोडसे यांनी व्यक्त केला आहे.
Finally, the approval of the river connection project, which will be a boon for Sinnar taluka, in the state cabinet