इंडिया दर्पण वृत्तससेवा
नाशिक जिल्ह्यात विशेषतः सिन्नर तालुक्यात यावर्षी पाऊस न पडल्याने दुष्काळी स्थिती उदभवली आहे. पर्यावरणाचा झालेला ऱ्हास यास कारणीभूत असून त्यासाठी मानवच जबाबदार असल्याने माध्यमिक लोकशिक्षण मंडळाच्या शहा येथील माध्यमिक व उच्चमाध्यमिक विद्यालयाने ही चूक सुधारण्यासाठी खारीचा वाटा उचलण्याचे ठरवले. त्यासाठी विज्ञान शिक्षिका वैशाली पाटील यांनी विद्यार्थ्यांना श्रीगणेशाची पिंपळ वृक्षावर स्थापना करण्याचे आवाहन केले. विद्यालयाच्या प्रांगणात असलेल्या पिंपळ वृक्षावर श्रीगणेशाची स्थापना करण्यात आली.
पर्यावरण पूरक साहित्य वापरून गणेशाची मूर्ती या झाडावर स्थापन करण्यात आली. विद्यार्थ्यांना वृक्षसंवर्धनाचे महत्व समजण्यासाठी अशा पद्धतीने श्रीगणेशाची स्थापना करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी याठिकाणी दर्शन घेऊन किमान एक तरी वृक्ष लागवड करण्याचा संकल्प केला असल्याचे विज्ञान शिक्षिका श्रीमती पाटील यांनी सांगितले. या पर्यावरणपूरक उपक्रमासाठी संस्थाध्यक्ष अण्णासाहेब गडाख, उपाध्यक्ष दौलतराव मोगल, ज्येष्ठ संचालक विजय गडाख, सीईओ अभिषेक गडाख यांनी कौतुक केले आहे. विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक नामदेव कानसकर,पर्यवेक्षक रमेश रौदळ, माधव शिंदे, रामचंद्र थोरात, अलका कोतवाल,वैशाली पाटील, बाळासाहेब कुमावत, प्रमोद बधान, राजेंद्र गवळी, दत्तात्रय आदिक, विश्वनाथ ठोक, नवनाथ पाटील, गणेश मालपाणी, भारती खंबाईत, बरखा, साळी, रवींद्र डावरे, सचिन रानडे, जगन शिंदे, सुनिल तासकर आदींनी मार्गदर्शन केले.
पिंपळाच्या झाडाचीच निवड का ?…
पिंपळाच्या झाडाचे आयुष्य ९०० ते १००० वर्षापर्यंत असून ते खूप मोठे होते. त्यापासून मोठ्या प्रमाणावर प्राणवायू मिळतो. शिवाय धाप लागणे, गॅस किंवा बद्धकोष्ठता, दातांसाठी, विषाचा परिणाम, त्वचा रोग, जखमा, सर्दी, त्वचेसाठी, ताण कमी करण्यासाठी औषध म्हणून या झाडाचा वापर केला जातो.विद्यार्थ्यांनी दीर्घकाळ टिकणारे असेच झाड लावावे म्हणून या झाडावर श्रीगणेशाची स्थापना केली.
वैशाली पाटील, विज्ञान शिक्षिका
वृक्षलागवडीचा संकल्प…
पर्यावरण रक्षण व संवर्धनासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करायचे होते.झाडावर श्रीगणेशाची स्थापना करून गणेशोत्सवाच्या उत्साही वातावरणात विद्यार्थ्यांनी किमान एक तरी झाड लागवड करण्याचा संकल्प केला आहे.
नामदेव कानसकर, मुख्याध्यापक
Lord Ganesha in Pimpal Tree, Environment Complementary Activity of School in Sinnar Taluka