इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
उत्तर सिक्कीममधील लोनाक तलावावर अचानक ढग फुटल्याने लाचेन खोऱ्यातील तीस्ता नदीला अचानक पूर आला. खोऱ्यातील काही लष्करी आस्थापना प्रभावित झाल्या असून तपशीलांची पुष्टी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
चुंगथांग धरणातून पाणी सोडण्यात आल्याने खालच्या प्रवाहात १५-२० फूट उंचीपर्यंत पाण्याची पातळी अचानक वाढली. त्यामुळे सिंगतामजवळील बारडांग येथे उभ्या असलेल्या लष्कराच्या वाहनांना फटका बसला आहे.
अचानक ढग फुटल्याने लाचेन खोऱ्यातील तीस्ता नदीला आलेल्या पूरामुळे लष्कराचे २३ कर्मचारी बेपत्ता असल्याची माहिती मिळाली असून काही वाहने गाळाखाली दबल्याची माहिती आहे. शोधमोहीम सुरू आहे.
पंतप्रधानांनी सिक्कीमच्या मुख्यमंत्र्यांशी केली चर्चा
नवी दिल्ली -पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेमसिंह तमांग यांच्याशी चर्चा केली आणि सिक्कीमच्या काही भागांमध्ये आलेल्या दुर्दैवी नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर परिस्थितीचा आढावा घेतला. या संकटकाळात सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासनही पंतप्रधानांनी दिले आहे.बाधितांच्या सुरक्षिततेसाठी आणि कल्याणासाठी पंतप्रधानांनी प्रार्थना केली.
पंतप्रधानांनी X या समाज माध्यमावर पोस्ट केले; “सिक्कीमचे मुख्यमंत्री @PSTamangGolay यांच्याशी चर्चा केली आणि राज्याच्या काही भागांमध्ये आलेल्या दुर्दैवी नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर परिस्थितीचा आढावा घेतला. या आव्हानात्मक परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. बाधित झालेल्या सर्वांच्या सुरक्षिततेसाठी आणि कल्याणासाठी मी प्रार्थना करतो. ”
Floods in Sikkim: 23 army personnel missing