इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
एकीकडे शिवसेनेच्या आमदार अपात्रत्रेच्या सुनावणीचे वेळापत्रक जाहीर झालेले असतांना दुसरीकडे ठाकरे गटाच्या चार खासदारांना शिंदे गटाकडून नोटीस पाठवण्यात आली आहे. विशेष अधिवेशनात व्हीप नाकारल्याचा ठपका ठेवत ही नोटीस खासदार विनायक राऊत, राजन विचारे, संजय जाधव आणि ओमराजे निंबाळकर यांना शिंदे गटाकडून पाठवण्यात आली आहे.
या नोटीस बद्दल शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली. या खासदारांवर कायदेशीर कारवाई केली जाईल असेही ते म्हणाले. यावेळी ते म्हणाले खासदार भावना गवळी या आमच्या पक्षाच्या व्हीप आहेत. लोकसभा अध्यक्षांनी त्याला अधिकृत मान्यता दिली आहे. या नियुक्ती संदर्भात कोणत्याही कोर्टात केस सुरु नाही. नियुक्ती संदर्भात उच्च किंवा सर्वोच्च न्यायलयाने कोणतेही आदेश दिलेले नाहीत. त्यामुळे आम्ही दिलेली नोटीस ही अधिकृत असल्याचा दावाही त्यांनी केला.
यावेळी त्यांनी विशेष अधिवेशात महिला आरक्षण विधेयकाच्या समर्थनार्थ मतदान करण्यासाठी व्हीप जारी करण्यात आले होते. पण या चारही खासदारांनी या विधेयकाच्या मतदानावेळी अनुपस्थिती दाखवली. त्यामुळे त्यांना ही नोटीस पाठवली असून त्यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याचे सांगितले. या नोटीस नंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. हे आम्हाला काय व्हीप बजावणार ?, असे सांगत त्यांनी २०२४ नंतर हे लोक कुठेच नसतील असे सांगितले.
Notice from Shinde group to these four MPs of Thackeray group