नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिवसेना नेते बबनराव घोलप यांनी उपनेतेपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांची नाराजी दूर करण्यासाठी शिवसेना भवनात आज बैठक होणार आहे. या बैठकीला शिर्डी लोकसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. मात्र या बैठकीला बबनराव घोलप मात्र गैरहजर राहणार आहे. शिर्डी लोकसभा मतदार संघात माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरेंना शिवसेनेत पुन्हा प्रवेश दिल्यानंतर घोलप नाराज झाले. त्यानंतर त्यांनी उपनेतेपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांची नाराजी दूर करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरु आहे.
वाकचौरेंना प्रवेश दिल्यानंतर घोलप यांचे शिर्डी लोकसभा मतदार संघाचे संपर्कप्रमुख पद काढण्यात आले. त्यामुळे त्यांनी उद्धव ठाकरे यांचा अहमदनगर दौरा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी राजीनामा दिला होता. या नाराजीनंतर संजय राऊत यांनी त्यांना भेटण्यासाठी बोलवले होते. त्या चर्चेनंतरही मार्ग निघू शकला नाही.
घोलप यांनी जर वाकचौरेंना उमेदवारी द्यायची होती तर मला का आश्वासन दिले ? माझे संपर्क प्रमुखपद का काढून घेण्यात आले ? उद्धव ठाकरे यांच्या शिर्डी दौऱ्यासंदर्भात मला का कळवण्यात आले नाही असे सवाल त्यांनी उपस्थितीत केले आहे. त्यामुळे शिवसेना भवन येथे होणा-या या बैठकीत काय निर्णय होतो. त्यात घोलप यांची नाराजी कशी काढली जाते. हे महत्त्वाचे असणार आहे.
Meeting today at Shivesna Bhavan; Baban Gholap’s resignation will be discussed