इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उद्योगपती गौतम अदानी यांच्याबरोबर झालेल्या भेटीचे स्पष्टीकरण केले आहे. यावेळी त्यांनी सांगितले की, अहमदाबाद जवळ एक इंडस्ट्रीयल इस्टेटमध्ये बारामतीच्या एका शेतकऱ्याने उद्योग उभा केला. मी त्या उद्योगाचे उद्घाटन करण्यासाठी गेलो होतो. दुधापासून शेतकरी कुटुंबाच्या व्यक्तीने दहा वर्ष अभ्यास करुन एक प्रोडक्ट निर्माण केले आहे. ते प्रोडक्ट दोन-तीन महिने दररोज सकाळी चहात टाकून घेतलं तर तुमची रोगप्रतिकार शक्ती वाढते. या प्रोडक्टचा कारखाना त्यांनी तयार केला. मला त्यांनी या कारखान्यांच्या उद्घाटनाला येण्याची विनंती केली असे ते म्हणाले. त्या व्यक्तीला प्रोत्साहित केले पाहिजे म्हणून मी गेलो. त्या कार्यक्रमाला गौतम अदानी यांना त्यांनी अध्यक्ष म्हणून बोलावले होते तर मला उद्घाटक म्हणून बोलावले होते. त्यामुळे मी आनंदाने गेलो.
चार दिवसापूर्वीच राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या हस्ते गुजरातमध्ये गौतम अदानींच्या पॉवरप्लांटचे उदघाटन संपन्न झाल्याचे वृत्त होते. त्यामुळे राजकीय चर्चेलाही मोठे उधाण आले. या उदघाटनाचा फोटो शरद पवारांनी ट्विट केला होता. त्यावेळेस ट्विटमध्ये श्री गौतम अदानी यांच्यासमवेत वसना, चाचरवाडी, गुजरात येथे भारतातील पहिल्या लॅक्टोफेरिन प्लांट एक्झिमपॉवरचे उद्घाटन करणे हा बहुमान होता असे म्हटले होते. या भेटीत या दोघांमध्ये पाऊण तास चर्चा झाल्याची माहिती समोर आली होती.
कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी वारंवार गौतम अदानी आणि नरेंद्र मोदी यांच्या संबंधावर टीका करत असतांना ही भेट राजकीय चर्चेचा विषय ठरली होती. याअगोदही शरद पवार आणि गौतम अदाणी यांची दोनदा भेट झाली होती. हिंडनबर्गच्या अहवालानंतर २० एप्रिल २०२३ ला अदाणी यांनी मुंबईत शरद पवार यांची भेट घेतली होती. तर, दुसरी भेट २ जून २०२३ मध्ये झाली आहे. ही काही नवीन गोष्ट नाही. पण, यावेळी थेट गुजरातमध्ये जाऊन पवार यांनी पॉवरप्लांटचं उदघाटन केल्यामुळे ही भेट चर्चेत ठरली होती.
शरद पवार हे इंडिया आघाडीतील प्रमुख नेते आहे. त्यामुळे या आघाडीतील एक घटक पक्ष अडाणी यांना टोकाचा विरोध करत असतांना ही भेट झाल्यामुळे काँग्रेस काय प्रतिक्रीया देते याकडे सर्वांचे लक्ष होते. पण, त्यांची काही प्रतिक्रिया आली नाही. दरम्यान या भेटीनंतर वंचित बहुजन आघाडीने जोरदार टीका केली होती. त्यात त्यांनी राष्ट्रवादी ही भाजपची बी-टीम आहे का ? प्रिय काँग्रेस, तुमच्या आवडत्या मित्राबद्दल तुमचे काय म्हणणे आहे ? असा प्रश्न उपस्थित केला होता.
या भेटीवर रोहित पवार यांनी शरद पवार अदाणी आणि अंबानी यांची भेट घेतात. छोट्या व्यावसायिकांनाही भेटतात. आपल्या देशाचा विकास कसा करता येईल ? याबाबत सगळ्यांमध्ये चर्चा होत असते. त्यावर पॉलिसी करत असतात. सगळ्या घटकांना भेटल्याशिवाय पॉलिसी करता येत नाही असे म्हटले होते. पण, आज पवार यांनी खरं कारण सांगितले व या भेटीचे स्पष्टीकरणही केले.