इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबई : काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमधून स्वत:चा गट घेऊन बाहेर पडणाऱ्या अजित पवार यांच्याबाबत शरद पवारांनी मोठे वक्तव्य केले आहे. अजित पवार मुख्यमंत्री होणार की नाही, त्यांची घरवापसी होणार का या संदर्भात शरद पवारांनी केलेल्या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ माजली आहे.
राष्ट्रवादीतील बंडाळीनंतर दोन्ही बाजूने टीका-टीप्पणी जोरात सुरू आहे. पक्षचिन्हासंदर्भात निवडणूक आयोगाकडे याचिका प्रलंबित आहेत. राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येणार, अशादेखील चर्चा सुरू आहेत. अशात आता शरद पवार यांनी अत्यंत परखड भूमिका मांडली आहे. त्यांच्या या वक्तव्यांनी संपूर्ण राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. भाजपाविरोधात जे सोबत येतील त्यांना घेऊन इंडिया आघाडी लढणार आहे.
काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना आमची तीन पक्षांची आघाडी आहे. शेतकरी कामगार पक्षासारखे काही आणखी पक्षही येतील, असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे. याचबरोबर अजित पवार मुख्यमंत्री होणे हे स्वप्नच राहणार असल्याचा टोला पवारांनी हाणला आहे. छगन भुजबळांच्या आरोपांवर शरद पवारांनी उत्तर दिले आहे. आमच्यातील काही लोकांचा भाजपासोबत जाण्याचा आग्रह होता. सुप्रिया सुळेंना अध्यक्ष करण्याचा प्रस्ताव हा भुजबळांचा होता. पण त्यांनी स्वीकारला नाही. त्यापुढची जी स्टेप होती ती आम्हाला कोणाला मान्य नव्हती. आपण खोटे बोलल्याचे भुजबळांनी मान्य केल्याचे शरद पवार म्हणाले.
घरवापसी नाहीच
अजित पवारांची घरवापसी शक्य आहे का? या प्रश्नावर शरद पवारांनी नाही असे म्हटले आहे. भाजपाचे सरकार नको अशी जनतेची भावना आहे, असे पवार म्हणाले. ५१ टक्के मते घेऊन आम्ही बारामती जिंकू असे बावनकुळे म्हणाले होते. यावर विचारले असता बावनकुळेंना आमच्या शुभेच्छा आहेत. त्यांना स्वतःला पक्षाने संधीदेखील दिली नाही, त्या माणसाला काय महत्व द्यायचे, असा टोला पवारांनी हाणला. देशात कंत्राटी नोकऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. शाळाही दत्तक देऊ लागल्याने खाजगी लोक त्याचा गैरवापर करतील अशी भीती राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली.