इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पुणे : सध्याच्या काळात नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक करण्याचे प्रकार अनेकवेळा उघड होत आहेत. तसेच विदेशात नोकरी लावून देण्यासाठी आर्थिक फसवणूक झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. पुणे शहरातील तीन महिलांची अशीच फसवणूक झाली. या महिला पुणे शहरातील मार्कट यार्डमधील आंबेडकरनगरमध्ये राहणाऱ्या आहेत. दोन महिन्यापूर्वीच अमरावती मध्ये देखील अशीच घटना घडली होती. सौदी अरेबियात नोकरी लावून देण्यासह त्यासाठी लागणारा व्हिसा, पासपोर्ट बनवून देण्याचे आमिष दाखवून येथील काही बेरोजगारांची तब्बल ४ लाख ३४ हजार रुपयांनी फसवणूक करण्यात आली. त्यांचे पासपोर्टसुद्धा ठेवून घेण्यात आले. या प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
घरमालकांनी मारहाण करून उपाशी ठेवले, पगारही दिला नाही….
गेल्या काही दिवसांपासून नोकरी तसेच पैसे कमावण्याचे अमिष दाखवून अनेकांना गंडा घातल्याच्या घटना समोर येत आहे. त्यातच पुण्यातील ३ महिलांना नोकरीचे अमिष दाखवून सौदी अरेबियात नेण्यात आले. मात्र तिथे त्यांचा अमानुष छळ करण्यात आला. अरेबियात सफाई कामगार म्हणून तुम्हाला नोकरी मिळेल, दरमहा ४० हजार रुपयांचे वेतन देखील मिळेल, असे अमिष दाखवलं. आर्थिक परिस्थितीमुळे या महिलांनी लगेच यासाठी होकार दिला. तसेच आमिषाला बळी पडून महिलांनी मुंबईतील दलाल महिलांशी संपर्क साधला.
महिलांना सौदी अरेबियात नोकरीची ऑफर दिली गेली होती. कागदपत्रांची जमवाजमव करत या महिला मुंबईतील एका एजंटमार्फत या महिला सौदी अरेबियात पोहचल्या. परंतु त्या ठिकाणी गेल्यावर त्यांना धक्काच बसला. सौदी अरेबियात असलेल्या त्या मध्यस्थ व्यक्तीने त्यांनी विविध ठिकाणी घरकामासाठी पाठवले. परंतु त्या ठिकाणी त्यांना काम देण्याऐवजी घरमालकांनी मारहाण केली. त्यांना उपाशी ठेवले. त्यांना पगारही दिला नाही. यामुळे या महिलांवर मोठे संकट आले.
महिला आयोगाने घेतली दखल
सौदी अरेबियातील रियाध शहरात या तिघींकडून साफसफाईचे दिवसभर काम करून घेतले जात होते. तसेच त्यांना वेळवर जेवण सुद्धा देत नव्हते. उपासमार आणि मारहाणीमुळे महिला त्रस्त झाल्या होत्या. त्यांनी सुटकेसाठी प्रयत्न सुरु केले. राज्य महिला आयोगाचा ईमेल आयडी त्यांनी मिळाला. तिघांपैकी एका महिलेने ईमेल करत राज्य महिला आयोगाला सुटका करण्याची विनंती केली. दरम्यान, एका सामजिक कार्यकर्त्याने ही बाब राज्य महिला आयोगाच्या निर्दशनात आणून दिली. महिला आयोगाच्या पाठपुराव्यामुळे या महिलांना भारतात परत आणण्यात यश आले.
याप्रकरणी मार्केटयार्ड पोलिसांनी मुंबईतील दलालांवर गुन्हा दाखल केला आहे. नसरीन भाभी, अब्दुल हमीद शेख, शमिमा खान आणि हकीम अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. राज्य महिला आयोगाने त्या मेलची दाखल घेत प्रयत्न सुरु केले. केंद्र सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क साधला. त्यानंतर परराष्ट्र मंत्रालयाने सौदी अरेबियातील परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क केला. तीन महिने प्रयत्न केल्यानंतर त्या महिलांना मायदेशी आणण्यात आले.
आता या तीन महिला सौदी अरेबियातून सुटल्यानंतर पुणे शहरात आठ दिवसांपूर्वी आल्या. त्यानंतर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी यासंदर्भात माहिती दिली. दरम्यान, महिला आयोगाने आतापर्यंत २० महिलांची परदेशातून सुटका केली आहे. त्यात दोन अल्पवयीन मुलींचा समावेश आहे. परदेशात नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक होत असल्यास महिलांनी आयोगाशी संपर्क साधावा, असे आवाहन चाकणकर यांनी केले आहे.
Saudi Arabia…This horrible thing happened to women in Pune…