इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबई – आमदार संजय शिरसाठ हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत उद्धव ठाकरे यांची साथ सोडून तर आले, पण पहिल्या दिवसापासून त्यांच्या नाराजीचा सूर आपल्याच सरकारच्या बाबतीत राहिला आहे. जेवढी टीका त्यांनी आतापर्यंत विरोधी गटातील नेत्यांवर केली नाही, त्यापेक्षा जास्त स्वतःच्या नेत्यांवर केली आहे आहे. आता पुन्हा एकदा त्यांनी एका विधानातून वाद ओढवून घेतला आहे.
गेल्या वर्षभरापासून मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला होता. त्यात मुहूर्त निघणार निघणार म्हणता थोडेफार फेरबदल झाले आणि विषय थंडबस्त्यात गेला. एकीकडे बच्चू कडू आणि दुसरीकडे संजय शिरसाठ हे दोघेही सातत्याने आपल्याच सरकारच्या विरोधात विधाने देत आले आहेत. अशात संजय शिरसाठ यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरील रोष जाहीरपणे बोलून दाखविला आहे. मात्र त्यासाठी त्यांनी वेगळा मार्ग निवडला आहे. त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात जाण्याचा सल्ला दिला आहे. ‘देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रात जावे आणि एकनाथ शिंदे यांनाच राज्यात ठेवावे’, असे वक्तव्य शिवसेना आमदार संजय शिरसाठ यांनी केले आहे.
त्यांच्या या वक्तव्यानंतर भाजपचे लोक तर नाराज झालेच आहेत, शिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही नाराजी व्यक्त केल्याचे समजत आहे. सरकारची समन्वय समिती त्यांना समज देणार असल्याचे कळते. शिरसाठ यांच्या वक्तव्यामुळे महायुतीतील नेते नाराज आहेत. महायुतीच्या समनव्य समितीच्या बैठीकित शिरसाठ यांना याबाबत समज दिली जाण्याची शक्यता आहे. त्यावर भाजपच्या नेत्यांच्याही तीव्र प्रतिक्रिया उमटायला लागल्या आहेत.
आमदार प्रवीण दरेकर यांनी शिरसाठ यांना उत्तर दिले आहे. ‘आम्हा कार्यकर्त्यांना देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रातच हवे आहेत. राज्यातील जनतेची इच्छा देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रचे नेतृत्व करावे, अशी आहे. राज्यावर आज अनेक संकट आहेत. सरकारने एकत्रितपणे सामोरे जाण्याची आवश्यकता आहे. अशावेळी महायुतीतील वातावरण दूषित होणार नाही, याची काळजी महायुतीच्या नेत्यांनी घेतली पाहिजे,’ असे ते म्हणाले आहेत.
Shinde group’s Sanjay Shirsath’s controversial statement about Fadnavis… what will happen now?