मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ग्रामविकास व पंचायत राज विभागांतर्गत राज्यातील ३४ जिल्हा परिषदेतील गट-‘क’ मधील ३० संवर्गातील एकूण १९,४६० इतकी रिक्त पदे सरळ सेवेने भरण्यात येणार असून या पदभरतीचा पहिला टप्पा ७ ते ११ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत पारदर्शक व काटेकोरपणे राबविण्यात येणार असल्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.
ग्रामविकास व पंचायत राज विभागांतर्गत पदभरतीची जाहिरात ५ ऑगस्ट, २०२३ रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. या जाहिरातीसाठी २५ ऑगस्ट २०२२ पर्यंत ऑनलाईन पध्दतीने उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले होते. या परीक्षेसाठी एकूण ११लाख ४ हजार ९८६ अर्ज प्राप्त झाले आहेत. या परीक्षेचा पहिला टप्पा ७ ते ११ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत राबविण्यात येणार आहे. या प्रथम टप्प्यामध्ये आठ संवर्गातील ५४७ रिक्त पदांसाठी परीक्षा घेण्यात येणार आहे. परीक्षेची संपूर्ण भरती प्रक्रिया शासनाने मान्यता दिलेल्या आय.बी.पी.एस. या कंपनीमार्फत राबविण्यात येत असल्याचे मंत्री श्री.महाजन यांनी सांगितले.
यामुळे या परीक्षेची संपूर्ण भरती प्रक्रिया अत्यंत पारदर्शक व काटेकोर पद्धतीने होणार आहे. काही समाज विघातक प्रवृत्तीच्या व्यक्तींकडून प्रलोभन दाखवून आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा फसवणुकीपासून उमेदवारांनी दक्षता घ्यावी. तसेच अशा प्रकारच्या कोणत्याही प्रलोभनास बळी पडू नये, अन्यथा अशी फसवणूक झाल्यास शासन अथवा जिल्हा परिषद जबाबदार राहणार नाही. अशा प्रकारे कोणतीही व्यक्ती परीक्षेसंदर्भात आर्थिक मागणी करीत असल्याबाबत निदर्शनास आल्यास त्याच्याविरुद्ध जवळच्या पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात यावी, असे सर्व उमेदवारांना ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले यांनी आवाहन केले आहे.
First phase of Rural Development Department Recruitment from 7th to 11th October 2023