इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नवी दिल्ली : अत्यंत गजबजलेल्या ठिकाणी असलेल्या सराफा दुकानात चोरट्यांनी धाडसी दरोडा टाकत सुमारे २५ कोटींचे दागिने लंपास केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी दुकान मालकाने फिर्याद दाखल केली असून या संदर्भात तपास सुरू आहे.
छत कापून दुकानात केला प्रवेश
चोरट्यांनी जंगपुरा येथील ज्वेलर्सवर दरोडा टाकला असून दुकानाचे छत कापून चोरट्यांनी शोरूममध्ये प्रवेश केला. येथून सोने, हिरे आणि दागिने चोरून चोरट्यांनी पळ काढला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. सीसीटीव्हीच्या मदतीने चोरट्यांचा शोध घेतला जात आहे. कारण दुकानात ठेवलेले सुमारे २५ कोटी रुपयांचे हिरे आणि सोन्याचे दागिने चोरट्यांनी पळवून नेल्याचे शोरूम मालकांचे म्हणणे आहे.
जंगपुरा मार्केटच्या या इमारतीत अनेक दुकाने असून शोरूमच्या पुढे पायऱ्या आहेत, तेथून चोरट्यांनी दुकानात प्रवेश करण्यासाठी छत कापले होते. कापलेल्या छताची व्हिडिओ क्लिपही समोर आली असून, त्यात चोरट्यांनी छोटी जागा कापून दुकानात प्रवेश केल्याचे दिसत आहे. मात्र, या घटनेचे कोणतेही सीसीटीव्ही फुटेज अद्याप समोर आलेले नाही, ज्यावरून चोरट्यांची ओळख पटू शकेल, असे सांगण्यात येत आहे.
चोरट्यांचा शोध घेण्याची मागणी
जंगपुरा येथील हे शोरूम उमराव सिंग आणि महावीर प्रसाद जैन यांचे शोरूम आहे. दुकानात सुमारे २५ कोटी रुपयांचे हिरे आणि सोन्याचे दागिने ठेवण्यात आल्याचे शोरूम सांगितले जाते, विशेष म्हणजे जंगपुरा बाजार सोमवारी बंद राहतो. त्यामुळे रविवारी शोरूम बंद केल्यानंतर मंगळवारी त्यांनी त्यांच्या शोरूममध्ये जाऊन पाहिले असता त्यांना धक्काच बसला.
शोरूममध्ये ठेवलेले संपूर्ण दागिने गायब असल्याचे त्यांनी पोलीसांना सांगितले. पोलीस घटनास्थळी पोहोचले असून घटनेचा बारकाईने तपास करत आहेत. कोणीतरी लक्ष ठेवून किंवा रेकी करून हा प्रकार केला असावा असे म्हटले जात आहे मात्र चोरट्यांचा तातडीने शोध घ्यावा, अशी मागणी दुकानदारांनी केली आहे.
Robbery at Saraf shop…. 25 crore worth of jewelery looted