इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबई – एखादी कंपनी नुकसान भरपाई किंवा नियमांमध्ये असलेल्या तरतूदींच्या जोरावर कर्मचाऱ्यांकडून पैसे वसूल करत असते. पण त्याला काहीतरी मर्यादा असते. इथे तर एका कंपनीने फक्त सहा कर्मचाऱ्यांकडून २१ कोटी रुपये वसूल करण्याचे आदेश दिले आहेत. सध्या या घटनेची चांगलीच चर्चा आहे.
कुठल्याही कंपनीत नोकरी करण्याचे काही नियम असतात. करारामध्ये ते नमूद केले असतात. नोकरी सोडण्याच्या १ किंवा ३ महिन्यांपूर्वी कंपनीला नोटीस देण्याचा नियम तर असतोच असतो. जर कंपनी बंद होणार असेल तर त्यांना तीन किंवा एक महिन्याचे फूल्ल सेटलमेंट द्यावे लागते. पण नोटीस न देता राजीनामा दिला तर कंपनी कर्मचाऱ्यांवर नुकसान भरपाईचा दावा करते.
अकासा एअर लाईन्सने विनानोटीस राजीनामा देणाऱ्या सहा वैमानिकांच्या विरोधात अशाचप्रकारची भूमिका घेतली आहे. राजीनामा दिल्यानंतर सहा महिने काम करणे वैमानिकांसाठी बंधनकारक होते. पण तसे न करताच त्यांनी काम बंद केले. वैमानिकांनी अचानक काम बंद केल्याने काही नियोजित विमानांची सेवा कंपनीला रद्द करावी लागली. त्यामुळे कंपनीचे मोठे आर्थिक नुकसान झाले तसेच कंपनीच्या प्रतिष्ठेलाही धक्का बसला.
असे अचानक काम बंद करणे हा नोकरीतील कराराचा भंग आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांनी प्रत्येकी १८ लाख रुपये व नुकसान भरपाई म्हणून प्रत्येकी २१ कोटी रुपये म्हणजे एकूण १२६ कोटी रुपये कंपनीला द्यावेत, अशी मागणी करत या कंपनीने सहा वैमानिकांविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली. वैमानिकांमध्ये कॅप्टन गरिमा कुमार, आदित्य यादव, कॅप्टन धीरेन सिंग चौहान, अनिल सेरराव, महेश खैरनार, अरविन नित्यनाथम यांचा समावेश आहे.
वैमानिकांचा दावा फेटाळला
सहा पैकी पाच वैमानिकांनी मुंबईत होणाऱ्या सुनावणीवर आक्षेप घेतला होता. आम्ही मुंबईत राहत नाही, आम्ही मुंबई बाहेरुन राजीनामा पाठवला होता. त्यामुळे कंपनीच्या दाव्यावर मुंबईत सुनावणी होऊ शकत नाही, असा या पाच वैमानिकांनाचा दावा न्यायमूर्ती एस. एम. मोडक यांनी बुधवारी फेटाळून लावला. वैमानिकांनी मुंबई बाहेरुन राजीनामा ई-मेलद्वारे पाठवला असला तरी कंपनीचे मुख्य कार्यालय हे मुंबईत आहे. हा राजीनामा स्विकारावा की नाकारावा किंवा काही अटी घालून राजीनामा स्विकारावा याचा निर्णय मुंबईतच होणार आहे, असे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
Resignation without notice… 6 employees will have to pay 126 crores?