इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबई : आरबीआयच्या नवीन निर्णयामुळे कर्जदारांना मोठा दिलासा मिळणार आहे. हा निर्णय कर्जदारांसाठी खऱ्या अर्थाने दिलासादायी ठरणार असल्याचे सांगण्यात येत आहे. जर तुमच्याकडे घर किंवा इतर कोणत्याही प्रकारचे कर्ज असेल तर तुमच्यासाठी ही बातमी फायद्याची आहे. कर्जाची परतफेड केल्यानंतर तारण ठेवलेल्या वस्तूंची कागदपत्रे आता तुम्हाला ३० दिवसांच्या आत परत केली जाणार आहेत.
आरबीआयने बँका आणि बिगर बँकिंग वित्तीय संस्थांसाठी नवीन सूचना जारी केल्या आहेत. नवीन नियम १ डिसेंबर २०२३ पासून लागू होणार आहेत. आरबीआयने १३ सप्टेंबर रोजी जारी केलेल्या अधिसूचनेत ही घोषणा केली आहे. आरबीआयच्या म्हणण्यानुसार, बँका आणि एनबीएफसीला कर्जाची परतफेड केल्याच्या ३० दिवसांच्या आत ग्राहकाला तारण ठेवलेल्या स्थावर आणि जंगम मालमत्तेची कागदपत्रे परत करावी लागतील.
आतापर्यंत प्रत्येक बँक आणि एनबीएफसी हे कर्जदारांना त्यांच्या सोयीने आणि वेळेनुसार कागदपत्रे परत करीत होते. त्यामुळे ग्राहकांमध्ये प्रचंड असंतोष पसरला होता. हे लक्षात घेऊन आरबीआयने नवीन नियम आणले आहेत. अनेकदा गृहकर्जासाठी घरच गहाण ठेवले जाते. तेव्हा वैयक्तिक कर्जासाठी बँका विमा पॉलिसी, शेअर्स किंवा सिक्युरिटीज गहाण ठेवतात. त्याच पार्श्वभूमीवर आरबीआयनं हा निर्णय दिला आहे.
तर बँकेला बसणार दंड
जर कर्ज दिलेल्या बँकेने तीस दिवसांच्या आत कागदपत्रे कर्जदाराला परत केली नाहीत, तर बँकेला प्रतिदिन ५ हजार रुपये दंड आकारला जाणार आहे. हा पैसा थेट कर्जदाराच्या खात्यात जाणार आहे. कर्ज पास झालेल्या शाखेतून किंवा कागदपत्रे उपलब्ध असलेल्या इतर कोणत्याही शाखेतून कागदपत्रे गोळा करण्याचा पर्याय ग्राहकांकडे राहणार आहे. कर्जदाराचा मृत्यू झाल्यास कोणत्याही अडचणीशिवाय कागदपत्रे कायदेशीर वारसांपर्यंत पोहोचतील याची बँकांनी खातरजमा करून घेणेही आवश्यक आहे.