इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबई – शरद पवार यांच्या विरोधात त्यांचे पुतणे अजित पवार यांनी चांगलेच दंड थोपटले आहेत. पक्षफुटीनंतर सुरुवातीला काही दिवस शांततेत गेले. त्यानंतर शरद पवार यांच्याकडूनही कुटुंब एकजोड असल्याचे सांगण्यात आले. पण आता दोन्ही बाजुंनी जोरदार हल्ला चढविण्यात येत आहे. त्यात अजित पवार यांनी मोठी खेळी खेळून काकांना धक्का दिला आहे.
शरद पवार यांनी राष्ट्रवादीतील फुटीनंतर बंड करणाऱ्या आमदारांवर कारवाई करणार असल्याचे सांगितले होते. त्यानतंर काहीदिवस या कारवाईबद्दल ते काहीच बोलले नाहीत. पण नंतर त्यांनी यासंदर्भात विधानसभा अध्यक्ष व निवडणूक आयोगाकडे वेगवेगळ्या याचिका केल्या. अर्थात शरद पवार यांची कुठलीही खेळी यशस्वी होण्यापूर्वीच अजित पवार यांनी बॉम्ब टाकला आहे. त्यांनी शरद पवार गटाच्या आमदारांवर पक्षादेश धुडकावल्याचे कारण देत त्यांच्या निलंबनासाठी विधानसभा अध्यक्षांकडे याचिका दाखल केली आहे. अजित पवारगटाकडून दाखल करण्यात आलेल्या या याचिकेनंतर आता विधानसभा अध्यक्ष काय निर्णय घेणार याकडेच सर्वांचं लक्ष लागून आहे. तसेच राष्ट्रवादी पक्ष कोणाचा आणि निवडणूक चिन्ह कोणाला मिळणार याबाबत ६ ऑक्टोबरला सुनावणी निवडणूक आयोगासमोर होणार आहे. या दिवशी अजित पवार आणि शरद पवार गट हे दोन्ही गट आपली भूमिका आयोगासमोर मांडणार आहेत. त्यामुळे या सुनावणीकडे देखील सर्वांचे लक्ष लागले आहे.
आम्हीच राष्ट्रवादी!
दोन्ही गटांकडून आम्हीच खरे राष्ट्रवादी काँग्रेस असल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यासंदर्भात दोन्ही गटांकडून निवडणुक आयोगाकडे अर्ज करण्यात आला आहे. यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावरही दोन्ही गटांकडून दावा करण्यात आला आहे.
शिवसेनेसारखीच स्थिती
शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील वादाने आता उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदे यांच्यातील वादाची पुनरावृत्ती केली आहे. शिवसेनेतही अशीच स्थिती गेल्या वर्षी सर्वांनी बघितली होती. त्यानंतर कायदेशीर लढाई जिंकून एकनाथ शिंदे यांनी शिवसेना हे नाव व पक्षाचे चिन्ह दोन्ही काबीज केले होते.