इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पुणे : विद्यार्थ्यांचे निकाल चुकविणाऱ्या प्राध्यापक आणि महाविद्यालयांवर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने अखेर कारवाईचा बडगा उचलला आहे. विविध विषयांच्या परीक्षांचे अंतर्गत गुण व प्रात्यक्षिक परीक्षांचे गुण देताना चुका करणाऱ्या प्राध्यापकांना विद्यापीठाच्या समितीने पाच हजार रुपयांपर्यंतचा दंड केला आहे.
विद्यापीठातर्फे एप्रिल-मे २०२३ या सत्रातील परीक्षांचे निकाल जाहीर झाल्यानंतर त्यात अनेक विद्यार्थ्यांचे अंतर्गत गुण भरण्याचे राहून गेल्याचे समोर आले. त्यात काही प्राध्यापकांकडून चुकीचे गुण भरले गेले. तर काहींकडून गुण भरण्यात त्रुटी राहून गेल्या. त्यामुळे विद्यापीठाच्या प्रमाद समितीमध्ये या प्रकरणी सुनावणी घेऊन संबंधित प्राध्यापकांवर कारवाई केली. तसेच विद्यापीठाच्या समितीने दिलेल्या शिक्षेची महाविद्यालयाने योग्य ती पूर्तता करून केलेल्या कार्यवाहीचा पूर्तता अहवाल परीक्षा विभागास सादर करावा, अशा सूचना दिल्या.
तसेच या पुढील काळात अशाच चुका केल्यास कठोर कारवाई केली जाईल, अशी समज दिली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान करणाऱ्या प्राध्यापकांची कोणतीही गय केली जात नसल्याचे स्पष्ट झाले आहे. विद्यापीठाने ३० सप्टेंबर रोजी ३७ पानी परिपत्रक काढून परीक्षेच्या कामात चुका केलेल्या संबंधित महाविद्यालयांची व प्राध्यापकांची यादीच प्रसिद्ध केली आहे. तसेच निकालात त्रुटी राहिल्या विद्यार्थ्यांची संख्या प्रसिद्ध केली आहे.
प्रमाद समितीसमोर हजेरी
दरम्यान, विद्यापीठाशी संलग्न ७८ महाविद्यालयांची यादी विद्यापीठाने प्रसिद्ध केली आहे. त्यातील काही प्राध्यापक प्रमाद समितीसमोर हजर होते. उर्वरित प्राध्यापकांना प्रमाद समितीसमोर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यामुळे इतरही काही प्राध्यापकांना शिक्षा देण्यात आली असल्याचे परीक्षा विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.
In case of giving wrong result…the professor will have to pay the penalty