इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पुणे : एका कर्जबाजारी मित्राने आपल्या श्रीमंत मित्राची पैशासाठी लुबाडणूक करून हत्या केली आणि तो साथीदारासह फरार झाला, पोलिसांना सापडू नये म्हणून त्याने तृतीयपंथी बनून मोठे नाटक रचले, परंतु अखेर पोलिसांच्या जाळ्यात सापडला. दारूच्या नशेत त्याची हत्या केली आणि दोघा पैकी एक जण हा मुंबईत तृतीयपंथी म्हणून तर दुसरा मूळ गावी जाऊन राहात होता. अखेर या दोघांना पिंपरी- चिंचवड च्या गुन्हे शाखा युनिट एकने अटक केली आहे.
त्याच्या श्रीमंतीचा घेतला फायदा
मित्रांमध्ये जर एखादा मित्र श्रीमंत असेल तर तो इतरांना मदत करतो, पण काही जण त्याच्या श्रीमंतीचा देखील गैरफायदा घेतात असाच प्रकार येथे घडला सचिन यादव हा श्रीमंत घरचा मुलगा होता, त्यांची एक कंपनी असून यातून यादव कुटुंबाला चांगला पैसा मिळतो. त्याचे मित्र रोहित नागवसे आणि गोरख फल्ले या दोघांनी सचिन सोबत जवळीक साधून यादव कुटुंबाला लुबाडण्याची गुप्त योजना केली. विशेष म्हणजे दोघांपैकी, एका आरोपी रोहित हा त्यांच्याच परिसरात राहत असल्याने त्याने सचिन सोबत जवळीक साधत मैत्री केली. अनेकदा काही व्यवहार करण्यासाठी सचिन सोबत आरोपी रोहित देखील होता. तसेच तिघेही खेड येथील जंगलात दारू प्यायला बसले त्यावेळेस दोघांनी सचिनच्या डोक्यात दगडाने मारून त्याची हत्या केली. दोघेही दारूच्या नशेत असल्याने त्यांनी नेमके काय केले समजले नाही, मात्र ते फरार झाले.
दोन्ही आरोपी हे एकमेकांचे नातेवाईक
आपला मुलगा बाहेरगावी गेला तो परतलाच नसल्याने कुटुंबाला चिंता निर्माण झाली, त्यामुळे यादव कुटुंबाने पोलीस ठाण्यात सचिन बेपत्ता असल्याची तक्रार दिली. पोलिसांनी देखील गांभीर्याने तपास करत तपासाची चक्रे फिरवत तांत्रिक विश्लेषण व सीसीटीव्हीच्या माध्यमातून आरोपींपर्यंत पोहोचले. अगोदर, मुंबईत एक महिना तृतीयपंथी म्हणून राहणाऱ्या रोहित नागवसे याला अटक केली.
मग बीड जिल्ह्यातील केज येथून गोरख फल्ले याला बेड्या ठोकल्या. दोन्ही आरोपी हे एकमेकांचे नातेवाईक असून रोहित आणि गोरख दोघेही कर्जबाजारी झाले होते. त्यामुळे त्यांना ते कर्ज सचिनच्या पैशातून फेडायचे होते. मात्र अगोदरच त्याची हत्या केल्याने कर्ज फिटले नाही, मात्र दोघांना अटक झाली आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.