इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पुणे : सध्या मुंबई, पुणे ,नागपूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर यासारख्या महानगरांमध्ये उंच उंच इमारती प्रचंड प्रमाणात दिसून येत आहेत. वाढत्या औद्योगीकरण, लोकसंख्या वाढ यामुळे शहरीकरण वाढल्याने भव्य अपार्टमेंट ही संकल्पना आता सर्वच ठिकाणी दिसून येते. साहजिकच उंच इमारतींना लिफ्टची व्यवस्था करण्यात येते. मात्र लिफ्ट वापरताना सुरक्षिततेची काळजी घेणे गरजेचे ठरते. अनेक ठिकाणी लिफ्ट मध्ये चालक नसतो, किंवा या ठिकाणी सुरक्षारक्षक देखील नसतो. त्यामुळे अलीकडच्या काळात लिफ्टमध्ये दुर्घटना वाढल्या आहेत. काही दिवसांपूर्वी मुंबई शहरात त्याचप्रमाणे छत्रपती संभाजीनगर मध्ये एक ज्येष्ठ नागरिक तसेच लहान बालिका अडकल्याची दुर्घटना घडली होती. त्यानंतर आता पुणे शहरात अशाच प्रकारे लिफ्ट मध्ये एक लहान मुलगा अडकला मात्र सुदैवाने अग्निशामक दलाने याची तात्काळ सुटका केल्याने दुर्घटना ठरली.
रात्रीच्या वेळी अडकला
पुण्यातील भवानी पेठेत सहा मजली इमारत असून या ठिकाणी लिफ्टची व्यवस्था आहे शनिवारी रात्रीच्या वेळी पहिल्या मजल्यावर एक लहान मुलगा लिफ्ट मध्ये बसला असताना अचानकपणे बंद पडली. शेजारी आणि घरच्यांच्या हे लक्षात आल्याने त्यांनी तात्काळ धावपळ सुरू केली. हा मुलगा अचानकपणे लिफ्टमध्ये अडकला होता. लिफ्टमधे अडकलेल्या लहान मुलाची अग्निशमन दलाकडून सुखरुप सुटका करण्यात आली आहे. सुमारे २० मिनिटांच्या प्रयत्नांतर अग्निशमन दलाने मुलाची लिफ्टमधून सुटका केली. अग्निशामक दलाच्या जवानांमुळे जवानांच्या सतर्कतेमुळे दुर्घटना टाळली.
जवानांनी असे केले बचावकार्य
रात्रीच्या वेळी अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षात भवानी पेठ येथे इमारतीत पहिल्या मजल्यावर लिफ्ट अचानक बंद पडल्याने एक मुलगा अडकल्याचा फोन आला होता. अग्निशमन मुख्यालयातून तातडीने फायरगाडी व रेस्क्यू व्हॅन रवाना करण्यात आल्या. घटनास्थळी पोहोचताच जवानांना हा लहान मुलगा सहा मजली इमारतीत पहिल्या मजल्यावर लिफ्ट बंद झाल्याने अडकला आहे, हे लक्षात आले. तो मुलगा अचानकपणे जोरजोजत रडत होता. मात्र घरच्यांनी व शेजाऱ्यांनी त्याला कसेबसे शांत केले. त्याचप्रमाणे जवानांनी मुलाला आवाज देत त्याच्याशी संवाद सुरू ठेवला. लिफ्ट रुममधे जाऊन तांत्रिकरित्या काम पार पाडत लिफ्ट पहिल्या मजल्यावर समांतर घेऊन दलाकडील स्प्रेडरचा वापर करुन लिफ्टचा दरवाजा उघडत लहान मुलाची तात्काळ सुखरुप सुटका केली. इमारतीतील प्रवाशांनी त्या जवानांचे आभार मानले.
The little boy got stuck in the lift of the society… The fire brigade rescued him like this..