इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पुणे – अंमल पदार्थांचा कुख्यात तस्कर ललित पाटील १८ महिने ससून रुग्णालयात उपचार घेत होता. तो आजारी होता म्हणून तिथे भरती होता. मग अचानक पळून कसा गेला, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. गेल्या आठ दिवसांपासून त्याचा शोध घेण्यात पोलीस लागले आहेत. मात्र त्याच्या १८ महिन्यांच्या वास्तव्यानेच मोठे प्रश्न निर्माण केले आहेत.
ललित पाटील गेल्या नऊ महिन्यांपासून रुग्णालयात उपचार घेत होता. त्यामुळे त्याला नेमका कोणता आजार झाला होता? असा प्रश्न ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता संजय ठाकूर यांना विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले की, ललित पाटीलच्या आरोग्याप्रश्नी हायकोर्टाकडूनही पत्र आलं होतं. त्यानुसार, तज्ज्ञ डॉक्टरांनी त्याची तपासणी करून हायकोर्टाला उत्तर सादर केलं आहे. ललित पाटीलला चार ते पाच प्रकारचे आजार झाले होते. त्याच्यावर चार डॉक्टर उपचार करत होते. पण एवढं सांगूनही त्याला नेमका कोणता आजार झाला होता, याचे उत्तर त्यांना देता आले नाही. त्याला कोणता आजार होता याविषयी मी सांगू शकत नाही. पण त्याला चार ते पाच प्रकारचे आजार होते. एकट्या रुग्णाला तीन ते चार डॉक्टर तपासत असतात. त्यानुसार, ललित पाटीलवरही चार ते पाच डॉक्टर उपचार करत होते. त्याच्या योग्य तपासण्या सुरू होत्या. तपासण्या करून ज्या आजारांचं निदान झालं, त्यानुसार त्याच्यावर उपचार सुरू होते, असे ते म्हणाले.
ससून रुग्णालयात उपचार घेणारा कैदी ललित पाटील याला चाकण परिसरात २०२० मध्ये अंमली पदार्थ विक्री प्रकरणात अटक करण्यात आली होती. पाटील स्वत: मेफेड्रोन तयार करत असल्याची माहिती पोलिसांनी न्यायालयात दिली. ससून रुग्णालयाच्या प्रवेशद्वारासमोर पोलिसांनी अंमली पदार्थ बाळगणाऱ्या एकाला गुन्हे शाखेने अटक केली. त्याच्याकडून दोन कोटी १४ लाख रुपयांचे मेफेड्रोन जप्त करण्यात आले. मात्र त्यानंतर, २ ऑक्टोबर रोजी तो रुग्णालयातून फरार झाला.
आमचा संबंध फक्त उपचाराशी
डॉक्टर हे त्या विषयातील तज्ज्ञ असतात. डॉक्टर रुग्णाला तपासत असतात तेव्हा तो आरोपी आहे की सामान्य माणूस आहे हे न पाहता उपचार करत असतात. ललित पाटील पळून गेल्याचे कळताच आम्ही आयुक्तांना कळवले होते. आरोग्य कर्मचाऱ्याचा केवळ उपचार करण्याशी संबंध असतो, त्यामुळे यावर अधिक भाष्य करणार नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.
Lalit Patil was sick, how did he escape?