इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबई – एक ड्रग्स तस्कर आजाराचे कारण करून कारागृहातून दवाखान्यात येतो. तिथे ड्रग्स रॅकेट चालवतो. त्याला सगळी यंत्रणा मदत करते. त्यानंतर तो तेथून फरार होऊन जातो. पळून जाण्याच्या घटनेला दहा दिवस उलटल्यानंतर आता राज्य सरकारला जाग आली असून सरकारने चौकशीसाठी समिती नेमली आहे.
कुख्यात ड्रग्स तस्कर ललित पाटील अठरा महिने पुण्यातील ससून रुग्णालयात होता. एवढे दिवस याठिकाणी त्याने कैद्यांसाठी असलेल्या वॉर्डात ठाण मांडलं होतं. त्याची प्रकृती ठीक नसल्याचे कारण देत त्याच वॉर्डात एवढे दिवस ठेवण्यात आले. त्याने रुग्णालातील चपराशापासून वरिष्ठांपर्यंत सर्वांना रसद पुरवली आणि ड्रग्स रॅकेट चालवले. ससून रुग्णालयातून रॅकेट चालविले जात आहे, याची खबर बाहेर कुणाला होऊ दिली नाही. दिवसाला ७० हजार रुपये याप्रमाणे आठवड्याला संपूर्ण रोख रक्कम तो रुग्णालयातील वरिष्ठांना द्यायचा. त्यानंतर संधी बघून ललित पाटीलने रुग्णालयातून पळ काढला. एक आठवडा उलटून गेल्यानंतर आता राज्य सरकारला जाग आली असून या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती नेमण्यात आली आहे.
राज्याचे वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर यांच्या अध्यक्षतेत चार जणांची समिती नेमण्यात आली आहे. या समितीत सोलापूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख, नांदेडच्या शासकीय महाविद्यालयातील न्यायवैद्यक शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. हेमंत गोडबोले आणि मुंबईच्या ग्रँट शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अस्थिव्यंगोपचार शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. एकनाथ पवार यांचा समावेश आहे.
१५ दिवसांत अहवाल
राज्य शासनाने या समितीला पंधरा दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. या घटनेची सविस्तर चौकशी करण्याच्या सूचना समितीला देण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे या समितीतील प्रत्येक सदस्य वैद्यकीय शिक्षण विभागातील आहे, त्यामुळे निष्पक्ष तौकशीची शक्यता कमी आहे. अशात त्रयस्त समिती नेमण्याची मागणी होत आहे.
नाशिक कनेक्शन
ललित पाटील हा मुळचा नाशिकचा आहे. त्याच्याशी संबधीत दोन ठिकाणी छापे पडले. एक छापा मुंबई पोलिसांनी टाकला, त्यानंतर दुसरा नाशिकच्या पोलिसांनी टाकला. मुंबई पोलिसांनी ३०० कोटीच्या आसपास ड्रग्ज मिळाले तर नाशिक पोलिसांनी ५ कोटीचे ड्रग्ज संबधीत साहित्य मिळाले. त्यानंतर त्याच्या घराची सुध्दा झाडाझडती घेण्यात आली.
राजकारणही तापले
गेल्या काही दिवसापासून या घटनेवरुन राजकारणी तापले आहे. पालकमंत्री दादा भुसे यांच्यावर थेट ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी आरोप केला. त्यानंतर त्याला भुसे यांनी प्रत्त्युत्तरही देत आरोपाचे खंडण केले. त्यानंतर नाशिक व मालेगावमध्ये भुसे यांच्या समर्थनार्थ आंदोलनही झाले.
Drug trafficking and administration of Sassoon Hospital.