पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गुणवत्तेशी कोणतीही तडजोड न करता अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून घरांच्या बांधकामाचा खर्च कमी करण्याच्या दृष्टीने बांधकाम व्यावसायिकांनी विचार करावा अशी सूचना केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज पुण्यात केली.
क्रेडाई या बांधकाम व्यावसायिकांच्या संघटनेच्या 40 व्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत ते बोलत होते. राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
घरांच्या बांधकाम खर्चात कपात करण्याच्या दृष्टीने संशोधन होण्याची गरज असून बांधकामासाठी वापरल्या जाणाऱ्या साहित्यात नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्याची गरज असल्याचे श्री गडकरी म्हणाले. बांधकामासाठी वापरल्या जाणाऱ्या स्टील आणि सिमेंट या पारंपरिक साहित्याचा वापर कमी करून पर्यायी सामग्रीचा वापर वाढण्याची गरज असून त्यासाठी क्रेडाई ने पुढाकार घेऊन स्वतंत्र संशोधन संस्था सुरू करण्याच्या दृष्टीने विचार करावा. अशी सूचना गडकरी यांनी केली.
एक कोटी रुपये पेक्षा अधिक किमतीची मोठी घरे बांधण्याऐवजी मध्यम वर्गीय लोकांना परवडतील अशी घरे उभारण्यास प्राधान्य द्यावे असेही श्री गडकरी म्हणाले. पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी बोलताना बांधकाम व्यावसायिकानी आता ग्रामीण भागाकडे अधिक लक्ष देण्याची गरज असल्याचे सांगितले ,स्थानिक प्रशासन बरोबर येणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी संयुक्त समिती स्थापन करण्याची सूचना पाटील यांनी यावेळी केली.
क्रेडाई चे राष्ट्रीय अध्यक्ष बोमन इराणी यांनी यावेळी बोलताना जी एस टी कायद्यात सुधारणा करण्याची मागणी केली त्याचबरोबर बांधकाम व्यावसायिकांना येणाऱ्या अन्य काही समस्या मांडल्या आणि केंद्र सरकारने त्यावर समाधानकारक तोडगा काढण्याची मागणी केली. क्रेडाई पुणे चे अध्यक्ष रणजित नाईकनवरे यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केले.
Union Minister Nitin Gadkari made these suggestions at the CREDAI program to reduce construction costs