इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पुणे – उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबाबतीतील कुठलीही बातमी हॉट टॉपिक असते. अजितदादा त्यांच्या तडकफडक स्वभावासाठी ओळखले जातात. त्यामुळे त्यांची भाषणे आणि पत्रकार परिषदा चांगल्याच गाजत असतात. आता त्यांनी राजीनामा दिल्याची चर्चा सुरू झाली, पण काहीच वेळात उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा नसून पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालकपदाचा राजीनामा असल्याची माहिती पुढे आली. दरम्यान पार्थ पवार यांची या जागेवर वर्णी लागणार असल्याची चर्चा आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पाडून अजित पवार यांनी सत्तेत सामील होण्याचा निर्णय घेतला. खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपलाच असल्याचा दावा करत त्यांनी निवडणूक आयोगात धाव घेतली. आता तिथे संघर्ष सुरू आहे. अशातच त्यांच्या राजीनाम्याची चर्चा कानावर पडल्याने अनेकांना आश्चर्य वाटले. पण त्यांनी पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालकपदाचा राजीनामा दिला आहे. अजित पवारांनी राजीनामा दिल्यानं संचालकपदाची एक जागा रिक्त झाली आहे. त्याजागी कुणाची वर्णी लागते ? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
अजित पवारांनी राजीनामा दिल्यानं राज्यातील राजकारणात चर्चेला उधाण आले होते. पण पुणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे यांनी यावर सविस्तर स्पष्टीकरण दिले आहे. गेली ३२ वर्षे अजित पवार जिल्हा सहकारी बँकेत काम करत होते. यादरम्यान आशिया खंडातील एक नंबर बँक म्हणून नावारूपास आली. पण, उपमुख्यमंत्रीपद आणि पक्षाचा कारभार वाढला आहे. त्यामुळे पक्ष संघटनेसाठी वेळ आणि उपमुख्यमंत्रीपदाला न्याय देण्यासाठी अजित पवारांनी सहकारी बँकेच्या संचालकपदाचा राजीनामा दिला. मात्र, अजित पवार दर महिन्याला बँकेचा आढावा घेणार आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
राष्ट्रवादीचा काय संबंध?
राष्ट्रवादीतील घडामोडींचा अजितदादांच्या राजीनामा देण्याशी काहीही संबंध नाही, असेही अध्यक्षांनी म्हटले आहे. वेळ देता येणार नाही म्हणून निवडणुकीत उभे राहू शकणार नाही, असे त्यांनी आधीच स्पष्ट केले होते. पण, कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव अजित पवार उभे राहिले होते. मात्र, आता वेळ देता येत नसल्याने राजीनामा दिला आहे. अजित पवारांचं मार्गदर्शन सदैव जिल्हा बँकेला राहणार आहे, असेही दुर्गाडे यांनी म्हटले आहे.
Ajit Pawar’s resignation? A heated debate in political circles