वर्धा (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गेल्या काही दिवसात केवळ मुंबई, पुण्यातच नव्हे तर मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये गुन्हेगाराच्या घटना घडत आहेत. त्यातच विदर्भातील वर्धा सारख्या शांत समजल्या जाणाऱ्या जिल्ह्यामध्ये एक खळबळजनक आणि भयानक घटना घडली. प्रेयसीचा खून करून प्रियकर पसार झाला होता. मात्र पोलिसांनी या संदर्भात तातडीने तपास करत आरोपीला अटक केली आहे. दुसऱ्याशी प्रेमसंबंध असल्याचा संशय घेत त्याने प्रेयसीच्या घरात घुसून तिची हत्या केली होती. याप्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेने करून अवघ्या ३६ तासांत आरोपी प्रियकराला मोठ्या शिताफीने बेड्या ठोकल्या आहेत.
तो चक्क रेल्वे स्थानकात महिनाभर तिची वाट पाहत थांबला
या संदर्भात पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, एक तरुणी ही नर्सिंग कॉलेजमध्ये शिकत होती. त्याच वेळी गणोरी ( जि. यवतमाळ ) गावाचा रहिवाशी आशिष उर्फ रमेश आढाऊ (३४), तिचेसोबत प्रेमसंबंध जुळले होते. दोन महिन्यांपूर्वी तिच्या गावी अल्लीपूर येथे आली होती. प्रियकर आशिषचा प्रेयसी सोबत फोनवरुन संवाद सुरू होता. प्रेयसी हिने आरोपी आशिषला यवतमाळ येथून वर्ध्याला भेटण्यासाठी बोलावले होते. आशिष हा वर्धा रेल्वेस्थानकावर आला मात्र प्रेयसी आली नाही. प्रेयसी ही आशिषला भेटण्याच टाळत होती. त्याने वारंवार फोनही केला पण तिने घेणे टाळले, तरीही अखेर आशिष हा महिनाभर वर्धा रेल्वेस्थानकावरच वाट पाहत राहिला. महिनाभर तो तेथे राहू लागला होता. दरम्यान, त्याचा संताप अनावर झाला, एकेदिवशी तो थेट प्रेयसीच्या घरी गेला आणि तिची हत्या केली. पोलिसांनी रेल्वे स्टेशनवर त्याला अटक केल्यानंतर त्याने तिचा खून केल्याची कबूल केले.
मोठया शिताफीने ठोकल्या बेड्या
माझी प्रेयसी मला भेटत नाही, म्हणजे तिचे कोणा दुसऱ्या सोबत संबंध असावेत या संशयावरून त्याने हे भयानक कृत्य केले. मात्र प्रेयसीची हत्या केल्याच्या दिवशी आशिष हा सुमारे तासभर अल्लीपूर गावात होता. मृत प्रेयसीच्या घरासमोरून घिरट्या घालत होता. तिच्या घरी कुणी नसल्याचे पाहून आरोपीने प्रेयसीच्या घरात प्रवेश केला. दोघांत वाद झाल्यानंतर त्याने तिची हत्या केली. १ तास आशिष प्रेयसीच्या घरात होता, त्यानंतर तेथून भितीने पळून गेला. याप्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखा आणि अल्लीपूर पोलिसांच्या पथकाने गोपनीय व तांत्रिक माहितीच्या आधारे केला.
पोलिसांनी आरोपीच्या शोधार्थ पथके रवाना केली. गुन्हे शाखेचे दोन शोध पथकांनी आरोपीचा राळेगाव, कळंब, यवतमाळ, बाभुळगाव, देवगाव परिसरात शोध घेतला. अखेर आरोपी धामणगाव रेल्वे स्टेशन येथे असल्याची माहिती मिळाली. येथे रेल्वेस्थानक परिसरात प्रियकराला पोलीसांच्या पथकाने मोठ्या शिताफीने त्याला अटक केली. मात्र आरोपीला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी मयत तरुणीच्या नातेवाईकांनी केली आहे.