इंडिया दर्पण वृत्तसेवा
गांधी जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी देशवासीयांना कृती करण्याचे अनोखे आवाहन केले आहे. मन की बातच्या १०५ व्या भागात पंतप्रधानांनी १ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता स्वच्छतेसाठी १ तास श्रमदान करण्याचे आवाहन केले. यावेळी बापू जयंतीच्या पूर्वसंध्येला देशातील सर्व नागरिक एकत्रितपणे त्यांना ‘स्वच्छांजली’ अर्पण करतील. ‘स्वच्छता ही सेवा’ अभियान या विषयावर बोलताना ते म्हणाले, १ ऑक्टोबर रोजी म्हणजेच रविवारी सकाळी १० वाजता स्वच्छतेबाबत एक मोठा कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे. तुम्हीही वेळ काढून स्वच्छतेच्या या मोहिमेत सहभागी होऊन मदत करावी. तुम्ही या स्वच्छता मोहिमेत तुमच्या गल्लीत किंवा परिसरात किंवा उद्यान, नदी, तलाव किंवा इतर कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी देखील सहभागी होऊ शकता.
या महास्वच्छता मोहिमेद्वारे सर्व स्तरातील नागरिकांना सार्वजनिक ठिकाणे जसे की बाजारपेठ, रेल्वे मार्ग, पर्यटन स्थळे, धार्मिक स्थळे इत्यादी ठिकाणी स्वच्छतेच्या प्रत्यक्ष उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले जाते. प्रत्येक शहर, ग्रामपंचायत, नागरी विमान वाहतूक, रेल्वे,माहिती आणि तंत्रज्ञान यासारख्या शासनाच्या सर्व विभागांना, सार्वजनिक संस्था नागरिकांच्या नेतृत्वाखाली स्वच्छतेच्या कार्यक्रमांसाठी सुविधा उपलब्ध करून देतील.सामाजिक संस्था,रहिवासी कल्याण संघटना, खाजगी उपक्रम, स्वच्छता कार्यक्रम आयोजित करण्यास इच्छुक असलेल्या संस्था पोर्टलच्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्था,जिल्हा प्रशासनाकडे ऑनलाइन अर्ज करू शकतात. स्वच्छता ही सेवा उपक्रमा संबंधी https://swachhatahiseva.com/ या खास निर्माण करण्यात आलेल्या संकेतस्थळावर सार्वजनिक माहितीसाठी स्वच्छता कार्यक्रम उपलब्ध असतील. स्वच्छतेच्या ठिकाणी नागरिक फोटो काढू शकतात आणि हे फोटो पोर्टलवर अपलोडही करू शकतात. या पोर्टलमध्ये नागरिकांना, मोहिमेला वाहून घेतलेल्या लोकांना या आंदोलनात सहभागी होण्यासाठी आणि स्वच्छता दूत बनून लोकांच्या चळवळीचे नेतृत्व करण्यासाठी आमंत्रित करणारा विभाग देखील आहे.
१५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबरपर्यंत साजरा होणारा स्वच्छता पंधरवडा हा- स्वच्छता ही सेवा २०२३ या उपक्रमाच्या स्वच्छता मोहिमेचा एक भाग आहे. जुन्या इमारतींचे जीर्णोद्धार, जलकुंभ, घाट, भिंती रंगविणे, नुक्कडनाटके स्पर्धा आयोजित करणे अशा विविध स्वच्छता उपक्रमात नागरिक सहभागी होत आहेत. हा पंधरवडा सुरू झाल्यापासून, या निमित्ताने आयोजित विविध कार्यक्रमात आतापर्यंत ५ कोटीहून अधिक नागरिक सहभागी झाले आहेत.
Prime Minister Narendra Modi made this appeal